इं’धना’साठी इथेनॉल निर्मिती फायद्याची

संतोष गव्हाणे 

पेट्रोलियमसह, औषध, रसायन, मद्यनिर्मिती कंपन्यांकडून साखर कारखान्यांकडे वाढती मागणी

पुणे- जागतिक पातळीवर कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा या इंधनाचे दर आगामी वर्षभरात 20 टक्‍क्‍यांनी वाढणार असल्याने याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो, असे जागतिक बॅंकेने कमोडिटी मार्केटस्‌ आउटलूक या आपल्या अहवालात म्हटले आहे. सध्या, कच्या तेलाचा प्रति बॅलर 53 डॉलरचा असलेला भाव 65 डॉलरपर्यंत पोहोचला आहे. यामुळे भारतात इंधनाचे दर सर्वोच्च पातळीवर जाणार हे निश्‍चित आहे.

-Ads-

जागतिक बाजारातून इंधनाची आयात कमी करणे आहे, हा यावरील पर्याय आहे; परंतु मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण साध्य करण्याकरिता इंधनात इथेनॉल मिसळणे हा एक चांगला पर्याय आहे. याच पार्श्‍वभूमिवर पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने बंधनकारक केल्याने पेट्रोयिलम कंपन्यांकडूनही याची कडक अंमलबजावणी होत आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांसह औषध, रसायनं तसेच मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडूनही इथेनॉलला मागणी वाढत आहे. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर पडायचे असेल तर साखर कारखान्यांकरिता इथेनॉल उत्पादन फायदेशीर ठरणार आहे.याबाबत इंडियन ऑईल कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी…

इंधनाचे वाढते दर आणि सरकारचे धोरण…
देशासह राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहेत. या आठवड्यात तर इंधन दराने उच्चांक गाठला आहे. दिल्लीत पेट्रोल 74.50 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 65.75 रुपयांवर पोहचले असून हे दर गेल्या चार वर्षांतील उच्चांकी आहेत. जागतिक बाजारपेठेतील स्थिती पाहता इंधनाचे दर कमी होण्याची शक्‍यता कमी आहे.

कारण, इंधनावरील कर हा किमतीच्या सुमारे एकचतुर्थांश असून तो कमी केल्यास सरकारला वित्तीय तूट कमी राखण्याचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु, इंधनावरील उत्पादन शुल्कात एक रुपया कपात केल्यास 13 हजार कोटी रुपयांचा फटका सरकारला बसेल, अशा स्थितीत पेट्रोल व डिझेलवरील विक्री कर अथवा व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारवरच दबाव टाकला जाऊ शकतो, याचा अर्थ आगामी काळात इंधन दरातील चढ-उतार मोठ्या प्रमाणात होतील.

शुद्ध अल्कोहोल प्रकल्प…
पेट्रोलियम, रसायन तसेच मद्यनिर्मिती करणाऱ्या देशांतर्गत कंपन्यांकडून होत असलेली इथेनॉलची मागणी वाढत आहे. ही गरज उत्तरप्रदेशातील साखर कारखान्यांकडून 40 टक्के पूर्ण केली जाते. इथेनॉल निर्मिीत महाराष्ट्रातील साखर कारखान्यानेही आघाडीवर असले तरी यामध्ये सातत्य नाही. इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिल्यास राज्यातील साखर उद्योगाला इथेनॉल विक्रीतून अंदाजे किमान सहा अब्ज रुपये मिळू शकतात.

आज, इथेनॉलला प्रतिलिटर 40.85 रुपये इतका दर आहे. हा दर मिळाला तर इथेनॉल उत्पादन फायदेशीर ठरते. याकरिता लागणारे शंभर टक्के शुद्ध अल्कोहल अशा कंपन्यांना पुरविणे हा एक महत्त्वाचा सहप्रकल्प साखर कारखान्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे सहवीज निर्मितीप्रमाणेच इथेनॉल उत्पादनाकडेही लक्ष देणे साखर कारखान्यांकरिता फायदेशीर ठरू शकते.

राज्यातून 50 कोटी लिटर अल्कोहोल…
99 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक शुद्ध असलेल्या अल्कोहोललाच इथेनॉल म्हटले जाते. साखर कारखाने सध्या अल्कोहोलचीच विक्री करतात. पेट्रोलियम, मद्य, औषध आणि रसायन उद्योगाची प्रत्येकवर्षांची अल्कोहोलची गरज किमान 50 कोटी लिटरपेक्षा अधिक असून ती वाढत आहे. गेल्यावर्षी इथेनॉलचा दर 38 रूपये होता, यात केंद्र सरकारने वाढ केली असून सध्या 40.85 रूपये लिटर दराने इथेनॉल विक्री कारखान्यांकडून केली जात आहे. या प्रमाणात दर मिळाला तर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती फायदेशीर ठरणार आहे.

राज्याची इथेनॉल उत्पादन क्षमता…
इथेनॉलच्या किमतीवरून यापूर्वी एकमत होत नसल्याने पेट्रोलियम कंपन्या पर्यायी साखर कारखान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. मात्र, आता 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे बंधन घातले असल्याने कंपन्यांपुढेही इथेनॉल खरेदीशिवाय पर्याय उरलेला नाही. पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी महाराष्ट्रात एका वर्षात 15 कोटी लिटर पेक्षा अधिक इथेनॉलची गरज भासते. राज्याची इथेनॉल उत्पादन क्षमता 90 कोटी लिटरची आहे, साखर कारखान्यांतून निर्माण होणाऱ्या शुद्ध अल्कोहलला (मळी) चांगला भाव मिळत असल्याने साखर कारखान्यांकरिता उत्पन्नाचा हा एक चांगला स्त्रोत आहे.

ब्राझीलचे तंत्र वापरावे…
ब्राझीलमध्ये शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इंधन आयातीवर होणारा खर्चही कमी आहे. याउलट अमेरिका, जपानसारखी राष्ट्रे ब्राझीलकडून इथेनॉल आयात करतात. इथेनॉलचे भाव वाढत असल्याने साखर निर्मितीसह इथेनॉलनिर्मितीला त्या देशात अधिक प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारात साखरेचे भाव पडल्यानंतर ब्राझीलमधील साखर कारखाने थेट इथेनॉल निर्मिती करतात. उसाच्या रसापासून थेट इथेनॉलनिर्मितीचे तंत्र ब्राझीलमध्ये आहे. यामुळेच जागतिक बाजापेठेत साखरच्या भावांत चढ-उतार झाला तरी तेथील कारखान्यांना फारसा काही फरक पडत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)