इंधनाच्या वाढत्या दराचा शेतकऱ्यांना फटका

मोशी – मागील काही वर्षांपासून शेतीच्या कामांसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढत चालला आहे. बहुतांश शेतकरी शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करत आहेत. पूर्वी शेतीत वापरले जाणारे बैल आता दिसत नाहीत. शेतीची बहुतेक कामे ही ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने काम आहेत. परंतु डिझेलच्या वाढत्या किंमतीचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ट्रॅक्‍टरद्वारे नांगरणीच्या दरात प्रति एकरी दीड ते पावणे दोन पटीने वाढ झाली आहे.

जिल्ह्यात काही भागात एखाद्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर त्यानंतरच्या दोन-तीन वर्षात दुष्काळी परिस्थिती असते. त्यामुळे पशुधन जगविणे शक्‍य होत नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बैल बारदाना मोडीत काढला आहे. शेतकरी शेतीच्या मशागतीपासून पिकांच्या काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राद्वारेच करु लागले आहेत. त्यात उन्हाळ्यामध्ये नांगरणी करणे, त्यानंतर खरीप व रब्बी हंगामात पेरणी करणे, मोगडा, काढणी व मळणीची कामे यंत्राद्वारे करुन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी ग्रामीण भागात ट्रॅक्‍टरची संख्या वाढली आहे. सध्या पावसाळा सुरु होण्याची शक्‍यता असताना शेतीमध्ये पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. बैल असणारे शेतकरी सकाळी लवकर शेतांमध्ये जाऊन अकरापर्यंत व दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मशागतीची कामे करत आहेत. बैल नसलेले शेतकरी ट्रॅक्‍टरद्वारे मशागतीची कामे करुन घेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मशागतीचा खर्च पेलवेना
गेल्या वर्षी ट्रॅक्‍टरने शेत नागरण्यासाठी दर एकरी आठशे रुपये इतका दर होता. यंदा डिझेलचे दर वाढले असल्याचे सांगत हा दर थेट 1300 रुपयांपर्यंत नेऊन पोहचवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे नांगरणीच्या दरांमध्ये वाढ झाली असल्याचे ट्रॅक्‍टर मालक व चालक शेतकऱ्यांना सागंत आहेत. त्यामुळे जास्तीचा दर देऊन नांगरणी करुन घेण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहिला नाही. आधीच शेतमालाला भाव मिळत नसताना मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)