इंधनाच्या चढ-उतारामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले

पिंपरी – देशभरात गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल व इतर इंधनाच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. वाहतूक व्यवस्था, भाजीपाला व इतर जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे, सर्वसामान्य नागरिकाला आर्थिक फटका बसत असल्याने नागरिक हवालदिल झाला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याने देशभरातील इतर व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळे, नागरिकांसाठी आवश्‍यक वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. मागील महिन्यात केंद्र व राज्य सरकारने इंधनावरील “व्हॅट’ कमी केल्यामुळे पेट्रोल- डिझेलचे दर काही प्रमाणात कमी झाले. यामध्ये, पेट्रोल पाच रुपये तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झाले. मात्र, मागील तीन-चार महिन्यांतील दराची तफावत बघता सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. सद्यस्थितीतील कच्च्या तेलाच्या किंमती बघता पेट्रोल व डिझेलमध्ये रोज पन्नास व साठ पैशांनी चढ-उतार होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतूक व्यवस्थेवर परिणाम
गेल्या काही महिन्यातील पेट्रोल व डिझेलचे भाव बघता वाहतूकीचे दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकजण कामानिमित्त इतर ठिकाणी ये-जा करत असतात. मात्र, इंधनाच्या भावाने शंभरीकडे वाटचाल केल्याने शहरातील खासगी वाहतूकदारांनीही मीटरचे दर वाढल्याने प्रवाशांना आर्थिक झळ बसत आहे.

दिवाळीच्या तोंडावर नागरिकांचं दिवाळं
दिवाळी तोंडावर येऊन ठेपली असल्याने महिलांनी दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी किराणा मालाच्या दुकानांमध्ये गर्दी केली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यातील इंधनवाढीमुळे सर्वच जीवनावश्‍यक वस्तू दिवाळीच्या तोंडावर महागल्या आहेत. यामुळे, दिवाळी करताना नागरिकांचे “दिवाळं’ निघणार हे निश्‍चित आहे.

जीवनावश्‍यक वस्तू महागल्या
इंधनाच्या वाढत्या दरामुळे शेतातील माल बाजारपेठेपर्यत आणताना होणाऱ्या खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. यामध्ये, छोटे शेतकरी व व्यवसायिक भरडले जात आहेत. डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रान्सपोर्ट कंपन्या बाजारपेठेमध्ये शेतीमाल पोहचविण्यासाठी जादा पैसे आकारत आहेत. त्यामुळे, भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. तसेच, बाहेरील राज्यातून येणाऱ्या फळांच्या दरात कित्येक पटीने वाढ झाल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. नागरिकांसाठी सर्वात आवश्‍यक वस्तू म्हणजे गॅस सिलिंडर. मात्र, सिलिंडरचा गॅस 871 झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खर्च आवाक्‍याबाहेर गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)