इंधनांवरील करकपात हा जुमला; लूट चालूच

कॉंग्रेसचे टीकास्त्र: जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मागणीचा पुनरूच्चार
नवी दिल्ली -इंधनांवरील करकपात हा केवळ जुमला आहे. मोदी सरकारकडून लूट चालूच आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसने पेट्रोल, डिझेल दरवाढ कायम राहिल्यावरून टीकास्त्र सोडले आहे.

इंधन दरांच्या भडक्‍यामुळे होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशातून मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. त्यामुळे दोन्ही इंधनांचे दर काही प्रमाणात खाली आले. मात्र, सरकारच्या त्या पाऊलानंतरही इंधन दरवाढीचे सत्र कायम आहे. तीन दिवसांच्या कालावधीत देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 53 पैशांनी तर डिझेल 87 पैशांनी महागले आहे. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेसने सोमवारी सरकारवर टीकेचा भडीमार केला.

-Ads-

जनतेच्या पाकिटांची लूट हे मोदी सरकारचे प्रथम कर्तव्य बनले आहे. सणासुदीच्या काळातही ती लूट थांबलेली नाही, असे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले. तर कॉंग्रेसच्याच आणखी एक प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी सरकारच्या करकपातीच्या पाऊलाला जुमला म्हटले. पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणावे, या पक्षाच्या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. देशातील 21 राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे त्या पक्षाची इच्छा असेल तर इंधनांना जीएसटीच्या कक्षेत आणणे शक्‍य असल्याचा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.

विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांनी दर कमी करावेत-भाजप
इंधन दरवाढीच्या मुद्‌द्‌यावरून भाजपने सोमवारी विरोधकांवर पलटावर केला. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना भाजपच्या प्रवक्‍त्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या, विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात प्रचार करण्याचे टाळावे. केंद्रातील आणि राज्यांमधील भाजप सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर 5 रूपयांनी खाली आणले. कॉंग्रेस आणि आप यांसारख्या विरोधी पक्षांनी दर कमी करण्याचे टाळून जनतेला मदत केलेली नाही. विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांनी दर कमी करावेत.

इंधन दर सरकारी नियंत्रणातून मुक्तच राहतील-प्रधान
इंधन दर सरकारी नियंत्रणातून मुक्तच राहतील. ते धोरण बदलण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कच्च्या इंधनांचे आंतरराष्ट्रीय दर आणि परकी विनिमय दर या घटकांच्या आधारे इंधन दरांचा दररोज आढावा घेण्याची व्यवस्था कायम राहील, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला सरकार जुमानणार नसल्याचेच संकेत मिळत आहेत. दरम्यान, ग्राहकांबाबत सरकार संवेदनशील असल्याचे म्हणत प्रधान यांनी नुकत्याच झालेल्या करकपातीकडे लक्ष वेधले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)