“इंद्रायणी’ मध्ये वैद्यकीय कचऱ्याचे ढीग!

  • आंबी येथील घटना : नदी पात्रात मुदतबाह्य औषधे

इंदोरी  (वार्ताहर) – आंबी-वराळे रस्त्यावरील पुलाशेजारी इंद्रायणी नदीकाठी वैद्यकीय कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी हा कचरा हटवण्यात यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व गावकऱ्यांनी केली आहे. इंद्रायणी नदीपात्रात अँटीबायोटिक, जुलाबाच्या गोळ्या, पेन किलर, मळमळ-उलटीच्या गोळ्या, मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्यांच्या शेकडो स्ट्रिप्स, तसेच भुलीच्या इंजेक्‍शनच्या बाटल्या, सुया, मलम, मुदतबाह्य औषधे आणि खोक्‍यात भरलेला धोकादायक औषधांचा वैद्यकीय कचरा अज्ञात व्यक्‍तीने टाकला. आंबी ग्रामपंचायतीच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी हा कचरा तातडीने बाजूला केला. नदीला जलपर्णीचा सर्वत्र विळखा निर्माण झाला आहेच, त्यात असे धोकादायक वैद्यकीय कचरा नदीपत्रात टाकला जात आहे.

वैद्यकीय कचरा, हॉटेलचे उर्वरित अन्न, मृत प्राणी, रोगराई होऊन मृत झालेल्या कोंबड्या नदी पात्रात किंवा नदीच्या जवळ बिनधास्त गेल्या कित्येक वर्षांपासून रात्रीचे टाकले जातात. याला कोठे तरी आळा बसण्याची गरज आहे. प्रदूषण करणारे बहुतांश नदी काठच्या गावातील रहिवासीच असतात, त्यामुळे कोणी त्यांना जाब विचारीत नाही. आंबी-नाणोली-वराळे-इंदोरी परिसरात इंद्रायणी गटर गंगा झाली आहे. नदीच्या पाण्याचा रंग काळपट झाला आहे व पाण्यातून उग्रवास येत आहे. इंदोरी परिसरात तरुण इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी पुढे आले; परंतु त्यांना शक्‍य झाले नाही. आंबी येथे झाल्या प्रकारामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर अवलंबून गावांतील रहिवाशी आणि पशुच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रोगराईची भिती व्यक्‍त केली जात आहे. जीवसृष्टीला धोकादायक जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत शहरी भागात कडक नियम असले, तरी ग्रामीण भागात मात्र हा कचरा उघड्यावरच फेकला जातो, याची खंत ग्रामस्थांनी व्यक्‍त केली.

कायद्यान्वये रुग्णालयांना नोंदणी करतानाच जैविक कचरा विल्हेवाटीबाबत उपाय-योजना बंधनकारक आहे. जैव कचरा जास्तीत जास्त 48 तासांच्या आत गोळा करून आधुनिक यंत्राच्या सहाय्याने त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे सक्‍तीचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

तळेगाव जनरल हॉस्पिटल आवारातील लाईफ सिक्‍युर केंद्रात जैव कचरा शुल्क आकारणी करून खास वाहनाद्वारे संकलित करून त्याची विल्हेवाट लावली जाते; मात्र जागरुकतेअभावी अद्यापही ग्रामीण भागातील काही वैद्यकीय व्यावसायिक विल्हेवाटीचा किरकोळ पैसा वाचवण्यासाठी धोकादायक जैविक कचरा उघड्यावर अथवा इंद्रायणी नदी वा नाल्यांत फेकतात.

महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने जैविक कचऱ्याची सखोल तपासणी करून तो नदीत फेकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी.
– जितेंद्र घोजगे, उपसरपंच, आंबी ग्रामपंचायत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)