“इंद्रायणी’ला पुन्हा जलपर्णीची झालर

चिंबळी, मोशी हद्दीतील स्थिती : नागरिकांच्य आरोग्यासह शेती धोक्‍यात

चिंबळी- काही महिन्यांपूर्वीच पावसामुळे नदीच्या पुरात जलपर्णी वाहून गेल्याने इंद्रायणी नदी मोकळा श्‍वास घेत संथ वाहत होती; परंतु, हा मोकळा संथ प्रवाह पुन्हा डबक्‍यासमान झाला आहे. या रसायनमिश्रित पाण्यात जलपर्णीचा विळखा वाढला असून नदीवरील चिंबळी, मोशी हद्दीतील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाण्याने जणू हिरवा शालू पांघरला असल्याचा भास होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील चिंबळी, मोशी, मोई, डुडुळगाव आदी गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून देहू ते मरकळ येथे इंद्रायणी नदीवर सहा ते सात बंधारे बांधले आहेत. मात्र, नदीचे पात्र जलपर्णीने झाकोळून गेले आहे. प्रदूषित सांडपाणी प्रक्रियेशिवाय नदीत सोडण्यात येत असल्याने जलपर्णी फोफावत असल्याने नागरिकांच्या आरोग्यसह परिसरातील शेती धोक्‍यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड भागातील तळवडे ,चिखली द्दीतून रसायन मिश्रित पाण्यातून त्याचप्रमाणे परिसरातील गावांमधून रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील वा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळून जलपर्णी फोफावत आहे. ही द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहणार आहे. याच द्रव्यांवर व इतर सेंद्रीय पदार्थांवर जीवाणूंची ही वाढ होत असते. अनेक रोगजंतू पाण्यात टिकून राहण्यात व त्यांची वाढ होण्यात या दूषित पदार्थांचा सहभाग असतो. जलपर्णी काढण्याबरोबर नद्यांना विष वाहिन्या होण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे नितांत गरजेचे झाले आहे. सध्या नदीपात्रातील जलपर्णी दिवासगणिक पसरत असून पिंपरी-चिंचवड महापालिकेनेच याबाबत तत्काळ पाऊले उचलल्यास जलपर्णीच्या वाढीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येणार असल्याचे जल तज्ज्ञांसह नागरिकांचे म्हणणे आहे.

  • नदीकाठच्या परिसरात पसरली दुर्गंधी
    या जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह वाहता नसल्याने एकाच जागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. याचा त्रास नदीकाठावरील चिखली, मोशी, चिंबळी, डूडूळगाव या गावांना होत आहे. परिसरातील वस्त्यांमधील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले असून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एकंदरीतच इंद्रायणीतील जलपर्णी आसपासच्या गावांना त्रासदायक ठरत असून इंद्रायणी शुद्धीकरणाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असला तरी त्याबाबत योग्य पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)