इंद्रायणीनगर चौकाला बेशिस्त वाहतुकीचे ग्रहण

भोसरी – अतिक्रमण, वाहतूक सिग्नलचा अभाव, बेशिस्त पार्किंग, उलट दिशेने येणारी वाहने यामुळे इंद्रायणीनगर चौकात वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

इंद्रायणीनगर सेक्‍टर-2 परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. येथील परिसरात भोसरी-एमआयडीसी असल्याने अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच, हा रस्ता पुढे मोशी व चाकण रस्त्याला जोडला गेल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या चौकाच्या जवळच महापालिकेचे क्रीडा संकुल व शाळाही आहेत. त्यामुळे शाळेच्या बसेस व खासगी वाहनांचीही येथे वर्दळ असते. कामगारांच्या दुचाकीही संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथे दिवसभर चौकात वाहनांची मोठी गर्दी होते. मात्र, सकाळी व सायंकाळी या चौकातील बेशिस्तपणामुळे वाहनांना अनेक तास ताटकळत थांबावे लागते. अनेक वाहने उलट्या दिशेने येतात.

वाहतूक पोलीस याठिकाणी नसल्याने अखेर स्थानिक नागरिक अथवा वाहन चालकांना तात्पुरत्या स्वरूपात ही वाहतूक कोंडी सोडवावी लागते. अनेक वेळा त्यावरून वादाचे प्रसंगही घडले आहेत. दुसरीकडे, या चौकात बेशिस्तपणे मोटारी आणि दुचाकी पार्क करण्यात येतात. त्यामुळे येथील चौक अधिकच अरुंद होतो. त्यात चौकातील रस्त्यालगतच खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले आहे. त्यांनी बाके व खुर्च्या या पदपथावरच मांडल्या आहेत. त्या पुढे दुचाकी चालक वाहने लावतात. चौकातील रस्त्याचीही मोठया प्रमाणात दुरावस्था झाली असल्याने त्याचाही फटका बसतो. रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ते लटकले आहे. वाहतूक शाखेकडून या ठिकाणी सकाळी व सायंकाळी जादा वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

इंद्रायणी चौकातील या समस्यांचा वाहनचालकांसमवेतच पादचारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना हा चौक ओलांडणेही धोक्‍याचे बनत आहे. यापूर्वी अनेक वेळा चौकात छोटे-मोठे अपघात झाले आहेत. परिसरात मोठी लोकवस्ती आहे. स्थानिक नागरिक व पादचाऱ्यांने अनेक तक्रारी महापालिका व पोलिसांकडे केल्या आहेत. पदपथ अस्तित्वात नाहीत. आहेत त्या पदपथावर अतिक्रमण झाले आहे. मात्र, या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)