‘इंदु सरकार’साठी ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्‍त केले मत

मुंबई : एकीकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना मनमोहन सिंहांकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आणण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे इंदिरा गांधींच्या जीवनावर आधारीत चित्रपटासाठी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकरला दिलासा देण्यात आला आहे. कारण सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी चित्रपटाचे ट्रेलर पाहून अतिशय आनंदी आहेत. तसेच त्यांनी या चित्रपटासाठी कॉंग्रेस किंवा गांधी घराण्यातील सदस्यांकडून ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
मी मधुर भांडरकरच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्याने भारतीय राजकारणातील एका काळ्या अध्यायावरचा पडदा दूर केला आहे. याबद्दल मी त्याचे आभार मानतो. हा एक असा काळ होता, ज्यावेळी जगासमोर देशाची मान खाली गेली होती. आणीबाणीच्या काळात आपल्या देशातील अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता, असे निहलानी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना वास्तविक घटना, किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तीच्या जीवनावर आधारीत चित्रपटासाठी ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे असल्याच्या नियमाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी, इंदु सरकार चित्रपटात कुणाचेही नाव घेण्यात आले नाही. ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी, संजय गांधी किंवा इतर कुणाचाही उल्लेख नाही. तुम्ही ज्यांचा उल्लेख करता, त्यांचा चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषेमुळे करत आहात असे सांगितले. दरम्यान, निहलानी यांनी, मी ट्रेलरमध्ये कोणाचेही नाव ऐकलं नाही. जर त्यांनी चित्रपटात याचा उल्लेख केल्यास, त्यावेळी आम्ही संपूर्ण चित्रपट पाहू. सध्या तरी एका तरी दिग्दर्शकाने आणीबाणीवर चित्रपट बनवल्याबद्दल मला आनंद होत आहे. हा आपल्या भारतीय राजकारणातला काळा अध्याय होता असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)