इंदापूरात सोमवार ते शुक्रवार डाळिंबाचे मार्केट भरणार

इंदापूर- शेतकरी बांधवांची दैनंदिन डाळिंब मार्केटची मागणी व इंदापूर येथील डाळिंब मार्केटला असलेला प्रतिसाद पाहून आज (सोमवार) पासून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात दररोज डाळिंबाची विक्री होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व सचिव जीवन फडतरे यांनी दिली.
आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, इंदापूर मार्केट कमीटीत सध्या मंगळवार, गुरूवार व शनिवार असे तीन दिवस डाळिंबाचे लिलाव होऊन विक्री होत होती. परंतु शेतकरी वेळोवेळी दैनंदिन डाळिंब मार्केट सुरू करण्याची मागणी करत होते. व डाळिंब मार्केटला मिळालेला प्रतिसाद विचारात घेऊन बाजार समितीने वाढती डाळिंब आवक व भविष्यातील भरघोस डाळिंब उत्पादनामुळे शेतकऱ्यांना डाळिंब विक्री करणे सोयीस्कर व्हावे या उद्देशाने आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार असे सलग पाच दिवस डाळिंब विक्री कामकाज सुरू राहणार आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस मार्केट बंद राहणार आहे. असा निर्णय घेतल्याचे सभापती जगदाळे यांनी सांगितले.
इंदापूलच्या मार्केट कमिटीत ज्या वेळी डाळिंबाचा सिझन चालू असतो त्यावेळी साठ हजार कॅरेट डाळिंब विक्रीला येतात. त्यापासून शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी रूपये मिळतात. सध्या डाळिंबाचा सिझन नाही तरी देखील तीन दिवसात तीस हजार कॅरेट विक्रीला येतात. त्यापासून दोन कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळतात.
इंदापूर मार्केटमध्ये पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बीड, बुलढाणा, लातुर, उस्मानाबाद या जिल्ह्यातून डाळिंबाची आवक होते असे सचिव जीवन फडतरे यांनी सांगितले. सर्व डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी इंदापूर बाजार समितीत डाळिंब विक्रीस आणून सहकार्य करावे व बाजार समितीच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती आप्पासाहेब जगदाळे व सचिव जीवन फडतरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)