इंदापुरातील काही टक्का मतांवर सुळेंना सोडावे लागणार पाणी?

मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा फटका

निमसाखर – माढ्याच्या राजकारणात माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घड्याळ काढून कमळ हातात घेतल्याने इंदापूर तालुक्‍यातील मोहिते पाटील नातेवाईक व समर्थकांत चलबिचल सुरू झाली आहे. कारण, हे मतदान राष्ट्रवादी कॉंग्रेस ऐवजी भाजपकडे वळणार आहे. यातूनच इंदापुरातील काही टक्का मतदानावर तरी खासदार सुप्रिया सुळे यांना पाणी सोडावे लागणार, अशी चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीचा बिगुल वाजल्यानंतर अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत. यामध्ये ज्यांच्या नावाची घोषणा झाली त्या बारामती मतदार संघातील तालुके खासदार सुप्रिया सुळे यांनी पिंजून काढले आहेत. आचार संहिते आगोदर खासदार सुप्रिया सुळे यांनी गावातील वाड्यावस्त्यांपर्यंत उद्‌घाटनांच्या कार्यक्रमाचा धडाका लावलेला असतानाच एकीकडे इंदापूर विधानसभेचे प्रबळ दावेदार म्हणून आजही आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव पुढे येत आहे, अशावेळी सावध पावले उचलत सुळे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांसह संग्राम थोपटे, संजय जगताप यांची भेट घेत लोकसभेला आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. अशातच अकलुज मधून रणजितसिंह मोहिते-पाटील हे कार्यकर्तांसह भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असताना बारामती विशेषत: इंदापूर मध्ये आता धाकधुक सुरू झाली आहे.

इंदापूर व बारामतीसह अन्य भागात मोहिते पाटील यांचे नातेवाईक समर्थकांची मोठी संख्या आहे. हे मतदान बारामती लोकसभेकरिता निर्णायक आहे. याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होत होता. मात्र, मोहिते पाटील यांनी भाजपचे हातातले घड्याळ काढुन हातात कमळ घेतल्याने आता मोहिते पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाशी जवळीक असलेले नातेवाई, समर्थक कोणती भुमिका घेतात, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवार सुळे यांच्या तोडीस तोड उमेदवार दिला तर मोहिते पाटील समर्थकांची मते भाजपच्या उमेदवार मिळतील. यातून सुळे यांचे मतदान घटू शकते. त्यामुळेच मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश हा सुळे यांच्याकरिताही धोक्‍याची घंडा असू शकतो. याचबरोबरोबर इंदापूर तालुक्‍यातील माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. आमदार भरणे हे देखील भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. यामुळे मोहिते पाटील यांच्यानंतर इंदापुरातून भाजपात सर्वात अगोदर कोण जाणार? याकडेही जनतेचे लक्ष लागुन राहिले आहे. यामुळे मोहिते पाटील नातेवाईक व समर्थक पवारांचा आदेश पाळणार की मोहिते पाटलाचे कमळ हातात घेणार? हे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसेल. याचबरोबर याचा पुढील विधानसभेच्या राजकारणात राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या उमेदवारावरही परिणाम होईल. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत नातेसंबंधावर मतदान घडेल की नाही हे काळच ठरवेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)