इंदापुरच्या कचरा डेपोला भीषण आग

रेडा- एकीकडे देशपातळीवर स्वच्छता मोहिमेत इंदापूर नगरपरिषदेचा गौरव होत आहे. मात्र, या आनंदाच्या भरात शहराच्या कचरा डेपोकडे पूर्णपणेदुर्लक्ष झाल्याने बुधवारी (दि. 1) रात्री सहाच्या सुमारास अचानक कचरा डेपोला भीषण आग लागल्याने लाखो रक्कमेचे नुकसान झाले असून या आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे इंदापूरकरांचे आरोग्य धोक्‍यात आले असून स्वच्छतेचा नुसताच गवगवा झाला मात्र, कचरा डेपोकडे नगरपरिषदेचा काणाडोळा असा आरोप नागरिकांनी केला आहे.
इंदापूर शहराचा कचरा डेपोबाबत अनेक वर्षांपासून समस्या असताना, नगरपरिषदेच्या माध्यमातून जमा केला जाणारा ओला व सुका कचरा इंदापूर-अकलूज रस्त्यालगत असलेल्या कचरा डेपोमध्ये टाकला जातो. या डेपोला अदयावत करण्यासाठी नगरपरिषदेने लाखो रूपये खर्चून शेड उभे केले होते मात्र, मागिल काहि कालावधीत तब्बल सात ते आठ वेळा या डेपोला वारंवार आग लागण्याच्या घडल्या असूनही नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या कचरा डेपोची व्यवस्था पुणे येथील एक नामांकित ठेकेदाराकडे आहे मात्र, तो डेपोमधून पैसा कमिवण्याचा धंदा करीत असून नियोजन व नियंत्रण ठेवत नसल्याने डेपोला अशा भीषण आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस, तसेच राष्ट्रवादीचे युवक नेते अशोक मखरे यांनी केला असून या ठेकेदाराला बदलण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, इंदापूर नगरपालिकाकडे अग्निशामन दलाची गाडी नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य नसल्याने डेपोतील कचरा भस्मसात होऊन आकाशात धुराचे लोटच्या लोट पसरले होते.

  • आग लागली का लावली ?
    इंदापूर नगरपरीषेदेच्या कचरा डेपोला सात ते आठवेळा अशी भीषण आग लागली असूनही त्याचे कारण आद्याप कळलेले नाही. या संदर्भात नगरपरिषदेचे आरोग्य स्वच्छता पर्यवेक्षक एस. एस. भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आग लागली का लावली ? याचा तपास नाही; परंतु 350 मे. टनापर्यंत सुका कचरा आगीत भस्मसात झाला असून अदयावत उभारलेले शेडही आगीत भस्मसात झाले, असे त्यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)