इंडीयन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: दिल्लीला हरवित अपराजित बंगळुरूची आघाडी 

बंगळुरू: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात अद्याप अपराजित असलेल्या बंगळुरू एफसीने दिल्ली डायनॅमोज एफसीला सोमवारी घरच्या मैदानावर 1-0 अश्‍या फरकाने हरवताना सहाव्या विजयासह आघाडीच्या स्थानावर झेप घेतली. श्री कांतीरवा स्टेडियमवर तीन मिनिटे बाकी असताना उदांता सिंग याने केलेला गोल या सामन्यात निर्णायक ठरला. या पराभवामुळे दिल्लीची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम राहिली. दिल्लीला असंख्य चालींचे फिनिशींग करता आले नाही. त्याचाच दिल्लीला फटका बसला. आयएसएलमध्ये आतापर्यंत बंगळुरू हा एकमेव अपराजित संघ आहे, तर दिल्ली हा एकही विजय न मिळालेला एकमेव संघ आहे.

सामना संपायला तीन मिनिटे बाकी असताना कर्णधार सुनील छेत्रीने अथक प्रयत्न करीत चाल रचली. त्याचा पहिला फटका अडविला गेला, पण रिबाऊंडवर संधी मिळतचा दक्ष उदांताने चपळाई दाखवित चेंडू नेटमध्ये घालविला. तर, संपुर्ण सामन्यात दिल्लीचे प्रयत्न फोल ठरविणारा बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याची चपळाई सुद्धा यजमान संघासाठी महत्त्वाची ठरली.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला बंगळुरूने गोल करण्याचा पहिला प्रयत्न केला. निशू कुमारच्या क्रॉस शॉटवर राहुल भेकेने केलेल्या हेडिंगवर जियान्नी झुईवर्लून याने चेंडू ब्लॉक केला. रिबाऊंडवर भेकेला संधी मिळाली, पण यावेळी मार्टी क्रेस्पीने ब्लॉकिंग केले. तर, लागलीच सहाव्या मिनिटाला चेंचो गील्टशेन याने उदांता सिंगला पास दिला. उदांताने उजवीकडून आगेकूच करीत मारलेला चेंडू मात्र गोलपोस्टवरून गेला.

त्या बरोबरच नवव्या मिनिटाला बंगळुरूची आणखिन एक संधी हुकली. झिस्को हर्नांडेझ याने छेत्रीला अप्रतिम पास दिला. छेत्रीने पहिल्या प्रयत्नात चेंडूवर नियंत्रण मिळविले, पण दुसऱ्या शॉटच्यावेळी त्याने जादा ताकद लावली आणि दिल्लीचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याने पुढे सरसावत चेंडू अडविला. दहाव्या मिनिटाला चेंचोने प्रयत्नपूर्वक चेंडूवर ताबा मिळवित बॉक्‍समध्ये प्रवेश करून फटका मारला, पण त्यात अचूकता नव्हती.

यानंतर 31व्या मिनिटाला दिल्लीच्या ऍड्रीया कार्मोना याने छांगटेला सुंदर पास दिला. छांगटेने मात्र बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्या अगदी जवळून फटका मारला. त्यामुळे गुरप्रीत सहज बचाव करू शकला. 36व्या मिनिटाला छांगटे पुन्हा केंद्रस्थानी होता. त्याने डावीकडून केलेला पहिला प्रयत्न अचूक नव्हता, तरी त्याने क्रॉस शॉट मारला. चेंडू एका प्रतिस्पर्ध्याच्या डोक्‍याला लागून नंदकुमार याच्यापाशी केला, तो प्रयत्न करणार तोच रिनो अँटोने पाय मध्ये घालत चेंडू बाहेर घालविला. दिल्लीच्या मार्कोस टेबारने 43व्या मिनिटाला झिस्कोला मागून पाडले. त्यावेळी बंगळुरूने पेनल्टीचे अपील केले, मात्र, पंचांनी ती फेटाळली.

बेंगळुरूने सात सामन्यांत सहावा विजय मिळविला असून त्यांनी एक बरोबरी साधली आहे. त्यांचे सर्वाधिक 19 गुण झाले. बेंगळुरूने एफसी गोवा संघाला मागे टाकले. गोव्याचे आठ सामन्यांतून 16 गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीने नऊ सामन्यांतून 14, तर चौथ्या स्थानावरील नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने सात सामन्यांत 14 गुण मिळविले आहेत. पाचव्या क्रमांकावरील मुंबईचे सुद्धा आठ सामन्यांत 14 गुण आहेत. यंदा गुणतक्त्‌यातील चुरस पाहता बेंगळुरूने या टप्यास तीन गुणांची आघाडी घेणे पुढे जाऊन बहुमोल ठरेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)