इंडिया ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धा; सायना, सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी

नवी दिल्ली- अग्रमानांकित पी. व्ही. सिंधू आणि चतुर्थ मानांकित सायना नेहवाल या अव्वल भारतीय महिला खेळाडूंसह किदंबी श्रीकांत, पारुपल्ली कश्‍यप व बी. साई प्रणीथ या अव्वल पुरुष खेळाडूंनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना इंडिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत विजयी सलामी दिली.

त्याचप्रमाणे आकर्षी कश्‍यप, मुग्धा आग्रे आणि ऋत्विका शिवानी गड्डे या उदयोन्मुख भारतीय महिला खेळाडूंनीही आकर्षक विजयांसह दुसऱ्या फेरीत धडक मारली. मात्र पायाला फोड आले असतानाही कोर्टवर उतरलेल्या एच. एस. प्रणयला आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदविता आली नाही आणि श्रेयांस जयस्वालकडून त्याला अखेर 4-21, 6-21 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या नव्या नियमामुळे किमान 12 स्पर्धा खेळण्याचा निकष पूर्ण करण्यासाठी प्रणयला मैदानात उतरावे लागले.

महिला एकेरीत गतविजेत्या पी. व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या नतालिया कोच ऱ्होडेचा 21-10, 21-13 असा सरळ गेममध्ये फडशा पाडला. मात्र सायना नेहवालला डेन्मार्कच्याच सोफी दहलवर मात करण्यासाठी 21-15, 21-9 अशी झुंज द्यावी लागली. सायनासमोर आता डेन्मार्कच्या लिने जार्सफेल्डचे आव्हान आहे. तर सिंधूला बल्गेरियाच्या लिंडा झेरचिरीशी झुंज द्यावी लागेल. लिंडाने भारताच्या वैदेही चौधरीचा प्रतिकार 21-19, 21-15 असा मोडून काढला.

पुरुष एकेरीत कश्‍यपने डेन्मार्कच्या हॅन्स व्हिटिंगसचा 21-14, 21-18 असा 43 मिनिटांत पराभव करीत विजयी सलामी दिली. श्रीकांतने तैवानच्या ली चेयुक यू याच्यावर 21-17, 21-18 असा 40 मिनिटांत विजय मिळविला. तर साई प्रणीथने राष्ट्रकुल उफविजेत्या राजीव औसेफची झुंज 21-11, 17-21, 21-17 अशी संपुष्टात आणताना आगेकूच केली.

महिला एकेरीत आकर्षी कश्‍यपने अनुरा प्रभुदेसाईवर 14-21, 21-18, 21-14 असा झुंजार विजय मिळविला. तर मुग्धा आग्रेने युक्रेनच्या त्सेनिया पोलिकार्पोव्हाचा कडवा प्रतिकार 16-21, 21-17, 21-12 असा 52 मिनिटांच्या लढतीनंतर संपुष्टात आणला. ऋत्विका शिवानी गड्डेने डेन्मार्कच्या अमेली हर्टझचा 21-17, 21-10 असा 32 मिनिटांत पराभव करीत दुसरी फेरी गाठली.

दुहेरीत भारतीय जोड्यांची आगेकूच

पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व चिराग शेट्टी या अव्वल भारतीय जोडीने चॅंग ताक चिंग व ही चुन मॅक या तैवानच्या जोडीवर 21-18, 21-14 अशी सहज मात करताना दुसरी फेरी गाठली. तसेच मनू अत्री व सुमित रेड्डी या जोडीनेही आदर्श कुमार व जगदीश यादव यांचा 21-7, 21-13 असा 21 मिनिटांत धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा व सिक्‍की रेड्डी या आठव्या मानांकित भारतीय जोडीने हफीझ फैझल व ग्लोरिया विजाजा या इंडोनेशियन जोडीचा 16-21, 21-17, 21-17 असा 57 मिनिटांच्या झुंजीनंतर पराभव करीत दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत अपर्णा बालन व केपी श्रुती या भारतीय जोडीने एरियल ली व सिडनी ली या मलेशियन जोडीवर 21-13, 21-12 असा केवळ 20 मिनिटांत विजय मिळविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)