इंडियन सुपर लीग फूटबॉल स्पर्धा : नॉर्थईस्टला हरवित बेंगळुरूची पुन्हा आघाडीला मुसंडी

बेंगळुरू: संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पुन्हा आघाडी घेतली. प्ले-ऑफच्या शर्यतीत असलेला प्रतिस्पर्धी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीवर बेंगळुरूने घरच्या मैदानावर बुधवारी 2-1 असा विजय मिळविला. मिस्लाव कोमोर्स्की याच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूचे खाते पुर्वार्धातच उघडले होते. नॉर्थईस्टने उत्तरार्धात 60व्या मिनिटाला उरूग्वेच्या फेडेरिको गॅलेगो याच्यामुळे बरोबरी साधणारा गोल केला, पण 11 मिनिटांत चेंचो गील्टशेन याने बेंगळुरूसाठी केलेला गोल निर्णायक ठरला. प्रदिर्घ हिवाळी ब्रेकनंतर बेंगळुरूला मुंबईत मुंबई सिटी एफसीविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.

बेंगळुरूचे खाते 14व्या मिनिटाला उघडले. हा स्वयंगोल असला तरी त्यातून बेंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांचे सेट-पिसेसवरील नियोजनाचे कौशल्य दिसून आले. मध्य रेषेजवळ मिळालेली फ्री किक डिमास डेल्गाडोने घेतली. त्यानंतर चेंडू सुनील छेत्रीच्या दिसेने जात होता, पण छेत्री थोडा मागे गेला आणि त्याने उदांता सिंगच्या दिशेने फटका मारला. उदांताचा बॉक्‍समध्ये आलेला चेंडू नॉर्थईस्टच्या फेडेरिको गॅलेगोच्या पायाला लागला. हा चेंडू अडविण्याचा प्रयत्नात कोमोर्स्कीकडून स्वयंगोल झाला.

नॉर्थईस्टने उत्तरार्धात 61व्या मिनिटाला बरोबरी साधली. रॉबर्ट लालथ्लामुआना याने लांबून मारलेला फटका थेट नेटजवळील डावीकडे गॅलेगोकडे आला. गॅलेगोने जुआनन आणि राहुल भेके या प्रतिस्पर्ध्यांना चकवित फटका मारला. हा चेंडू बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्या दोन पायांमधून नेटमध्ये जाणे श्री कंठीरवा स्टेडियमवरील उपस्थित स्थानिक चाहत्यांसाठी धक्कादायक ठरले.

बेंगळुरूने मग लवकरच चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. थ्रो-इनवर राहुल भेकेने दिलेला चेंडू जुआनन याने चेंचोकडे सोपविला. चेंचोने मग मैदानावर घसरत शानदार फटका मारताना नॉर्थईस्टचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला चकविले. यानंतर गुरप्रीतने बेंगळुरूचे नेट सुरक्षित राखले.

पुर्वार्धात चुरशीचा खेळ झाला. दुसऱ्याच मिनिटाला बेंगळुरूच्या रिनो अँटोने प्रयत्न केला, पण रॉबर्ट लालथ्लामुआना याने चेंडू ब्लॉक केला. चेंडू बाहेर गेल्याने बेंगळुरूला मिळालेल्या कॉर्नरवर फार काही घडले नाही. सहाव्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या फेडेरिको गॅलेगो याने मुसंडी मारायचा प्रयत्न केला, पण बेंगळुरूच्या बचाव फळीने त्याला रोखले.
सुनील छेत्रीने आठव्या मिनिटाला दिलेल्या पासवर डिमास डेल्गाडोचा फटका स्वैर गेला. पुढच्याच मिनिटाला बेंगळुरूच्या किन लुईस याने डावीकडून आगेकूच केली. त्याने बॉक्‍समध्ये प्रवेश करताच रेडीम ट्‌लांग याने त्याला पाडले. त्यावर यजमान संघाने पेनल्टीचे अपील केले, पण पंच सी. आर. श्रीकृष्ण यांनी ते फेटाळून लावले.

छेत्रीला 21व्या मिनिटाला संधी मिळाली होती. गुरप्रीतसिंग संधूने गोल कीकवर जोरात मारलेला चेंडू छेत्रीपाशी आला. बॉक्‍सजवळ डावीकडे चेंडू आला तेव्हा छेत्रीने अंदाज घेत उदांताकडे पास द्यायचा प्रयत्न केला, पण तो चुकून चेंडू कोमोर्स्की याच्याकडे गेला. त्यामुळे ही संधी वाया गेली.

26व्या मिनिटाला रेडीमने केलेला प्रयत्न रिनो अँटोने फोल ठरविला. चेंडू बाहेर गेल्याने मिळालेला कॉर्नर गुरप्रीतने थोपविला, पण रिगन सिंगकडे चेंडू गेला. त्याच्या पासवर कोमोर्स्कीने केलेले हेडींग मात्र स्वैर होते.
मोसमातील पहिल्याच पराभवातून सावरत बेंगळुरूने 13 सामन्यांत नववा विजय मिळविला असून तीन बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 30 गुण झाले. त्यांनी मुंबईला मागे टाकले. मुंबईचे 13 सामन्यांतून 27 गुण आहेत. नॉर्थईस्टचे तिसरे स्थान कायम राहिले. 14 सामन्यांत सहा विजय, पाच बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 23 गुण आहेत.
निकाल
बेंगळुरू एफसी ः 2 (मिस्लाव कोमोर्स्की 14-स्वयंगोल, चेंचो गील्टशेन 71)
विजी विरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड एफसी ः 1 (फेडेरिको गॅलेगो 60)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)