इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: मोडोऊच्या गोलमुळे मुंबईची चेन्नईयीनवर मात

चेन्नई: हिरो इंडियन सुपर लीग मध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात गतविजेत्या चेन्नईयीन एफसीची विजयाची प्रतीक्षा आणखी लांबली असून मुंबई सिटी एफसी विरुद्ध चेन्नईयीनला एका गोलने पराभूत व्हावे लागले आहे. मुंबईच्या मोडोऊ सौगौ याने 20 व्या मिनिटाला केलेला गोल यावेळी निर्णायक ठरला. मुंबईने चिवट बचावाच्या जोरावर चेन्नईयीनच्या चाली फोल ठरविल्या, पण मुळातच चेन्नईयीनच्या आक्रमणात पुरेशी भेदकता नव्हती. त्यामुळे नेहरू स्टेडियमवरील घरच्या मैदानावर चेन्नईयीनची अखेर निराशा झाली.

सामन्याची सुरुवात मुंबईसाठी चांगली झाली. चौथ्या मिनिटाला मुंबईच्या पाऊलो मॅचादो याने उजवीकडून फ्री किक घेतली. त्यावर अरनॉल्ड इसोको याचा प्रयत्न फसला आणि चेन्नईयीनच्या थोई सिंगने बचाव केला. सहाव्या मिनिटाला चेन्नईयीनने प्रयत्न केला. रफाएल आगुस्तो याचा पासवर कार्लास सालोम याने मारलेला फटका नेटवरून गेला. 11व्या मिनिटाला चेन्नईयीनने चांगली चाल रचली. अनिरुद्ध थापाने उजवीकडून फ्रान्सिस्को फर्नांडिसला पास दिला, पण अचुकतेअभावी ही संधी गेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन मिनिटांनी चेन्नईयीनला कॉर्नर मिळाला. त्यावर इसाक वनमाल्साव्मा याने डावीकडून फटका मारला, पण मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने उडी घेत चेंडू बोटांनी दूर घालविला, अन्यथा अँड्रीया ओरलॅंडी याला चांगली संधी मिळू शकली असती. 18व्या मिनिटाला ओरलॅंडीने सुमारे 25 यार्डावरून मैदानाच्या मध्यभागी मिळालेली फ्री किक घेतली, पण मुंबईच्या शुभाशिष बोस याने बचाव चोख केला.

यानंतर, मुंबईने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. 20व्या मिनिटाला चेन्नईयीनच्या इनिगो कॅल्डेरॉन याला मुंबईच्या रफाएल बॅस्तोस याला रोखता आले नाही. त्यामुळे मोडोऊला संधी मिळाली. डावीकडून मुसंडी मारत मोडोऊने उरलेले काम फत्ते केले. त्यात त्याला चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याची ढिलाई फायदेशीर ठरली.
दुसऱ्या सत्रात 48व्या बॅस्तोसने डावीकडे मोडोऊला पास दिला, पण करणजीतने डावीकडे झेपावत चपळाईने बचाव केला. 51व्या मिनिटाला ओरलॅंडीने बॉक्‍समध्ये पास दिला. त्यावेळी कार्लोस सालोम आणि मुंबईचा ल्युचियन गोऐन या दोघांनी एकाचवेळी उडी घेतली. त्यात ल्युचियन सरस ठरला आणि त्याने मुंबईचे क्षेत्र सुरक्षित राखले. पुढच्याच मिनिटाला चेन्नईयीनला फ्री किक मिळाली. उजवीकडे सुमारे 25 यार्ड अंतरावरून सालोमने मारलेला चेंडू स्वैर होता आणि तो क्रॉसबावरून बाहेर गेला.

पाच मिनिटांनी मुंबईला दुसऱ्या गोलची संधी होती. इसोकोने उजवीकडून घोडदौड करीत मोडोऊ याला पास दिला. मोडोऊचा पहिला फटका चुकला, पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने चेंडू इसोकोला परत देण्याचा प्रयत्न केला, पण एली साबिया याने चेंडू मध्ये अडविला. त्यावेळी मोडोऊ ऑफसाईड वाटत होता, पण तसे निशाण फडकले नाही.
60व्या मिनिटाला मुंबईच्या सेहनाज सिंग याने उजवीकडून कॉर्नर घेतला. त्याने हेडिंगसाठी उडी बरोबर घेतली, पण त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागला. दोन मिनिटे बाकी असताना फ्रान्सिस्को फर्नांडीसने बॉक्‍समध्ये क्रॉस पास दिला. त्यावेळी जेजे लालपेखलुआ संधी साधण्यासाठी सज्ज होता, पण ल्युचियन याने दंडाने त्याला बाजूला ढकलले, त्यावेळी पंचांचे लक्ष नीट नव्हते. अन्यथा चेन्नईयीनला पेनल्टी मिळू शकली असती.

मुंबई सिटी एफसीने सहा सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून एक बरोबरी साधली आहे. त्यांनी दोन सामने गमावले आहेत. त्यांचे 10 गुण झाले. एफसी गोवा, जमशेदपूर एफसी, बेंगळुरू एफसी आणि मुंबई अशा चार संघांचे प्रत्येकी दहा गुण झाले. त्यात गोलफरकानुसार गोवा (15-9, 6) दुसऱ्या, जमशेदपूर (12-7, 5) तिसऱ्या, बेंगळुरू (8-3, 5) चौथ्या, तर मुंबई (6-8, उणे 2) चौथ्या स्थानावर आहे. नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने सर्वाधिक 11 गुणांसह आघाडी घेतली आहे. चेन्नईयीनला सहा सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यांना एकमेव बरोबरी साधता आली असून एका गुणासह त्यांचे अखेरचे दहावे स्थान कायम राहिले. त्यांचा गोलफरक 5-11 असा उणे 6 आहे.

निकाल :
चेन्नईयीन एफसी : 0 पराभूत विरुद्ध मुंबई सिटी फुटबॉल क्‍लब : 1 (मोडोऊ सौगौ 20′)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)