इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: गोव्याकडून नॉर्थइस्टचा धुव्वा

गोवा: एफसी गोवा संघाने धडाकेबाज खेळ करताना आपली मोहिम पुन्हा विजयी मार्गावर आणली. गोव्याने नॉर्थइस्ट युनायटेड एफसीचा 5-1 असा धुव्वा उडविताना चालू हंगामातील आपला सर्वात मोठा विजय संपादित केला. या विजयाबरोबरच गोव्याने गुणतक्त्‌यात पाचव्या क्रमांकावरुन दोन क्रमांक आगेकूच करीत तिसरे स्थान गाठले. गोव्याने सामन्यातील सर्व गोल उत्तरार्धात केले. स्पेनचा दमदार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने खाते उघडण्यासह दोन गोलांचे योगदान दिले. एदू बेदिया, ह्युगो बौमौस व मिग्युएल फर्नांडेझ यांनी प्रत्येकी एक गोल केला.

तर, नॉर्थइस्टची मदार बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर होती, पण त्याला 90व्या मिनिटास एकच गोल करता आला. गोव्याच्या बचाव फळीने आपली जबाबदारी चोख पार पाडली. दुसरीकडे नॉर्थइस्टची बचाव फळी कोरोला रोखू शकली नाही. गोल्डन बूट किताबाच्या शर्यतीत कोरोने दहा गोलांसह आघाडी घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोव्याची खाते उघडण्यासाठीची प्रतिक्षा जी कोरोने संपुष्टात आणली. ह्युगो बौमौस याने रचलेल्या चालीवर जॅकीचंदने कोरोला दिलेल्या अप्रतिम पासवर कोरोने उजव्या पायाने चेंडूला नेटची दिशा दिली. कोरोने जवळून मारलेल्या अचूक फटक्‍यावर नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमारला चकवत पहिला गोल केला. त्यानंतर दहा मिनिटांनी ह्युगोने बेदीयाला चेंडूसह मोकळीक दिली. त्यावेळी पवन मैदानावर पडला होता. त्यामुळे बेदीयाने त्याच्यावरून चेंडू सहज नेटमध्ये मारत गोव्याला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनी ब्रॅंडन फर्नांडीस याने उजवीकडून चाल रचत बॉक्‍सपाशी ह्युगोला पास दिला. ह्युगोने मग डाव्या पायाने चेंडूला नेटची दिशा देत हि आघाडी 3-0 अशी केली. तर, कोरोने आणि त्यानंतर भरपाई वेळेत मिग्युएल यांनी गोल करीत गोवेकर फुटबॉलप्रेमींना पर्वणी देत 5-1 असा विजय मिळवून दिला.
नॉर्थइस्टला पाचव्या मिनिटाला कॉर्नर मिळाला. जुआन मॅस्कीया याने लांबून प्रयत्न केला, पण त्याने मारलेला चेंडू गोव्याच्या एका खेळाडूला लागून बाहेर गेला. कॉर्नरवर फेडेरिको गॅलेगोने चेंडू मारला. हा चेंडू पुन्हा गॅलेगोकडे मारण्यात आला. त्याने उजव्या पायाने मारलेला क्रॉस शॉट गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने सहज अडविला.

दहाव्या मिनिटाला गोव्याच्या सेरीटॉन फर्नांडीसने मध्य रेषेपाशी उजवीकडे चेंडू मिळताच घोडदौड सुरु केली. नॉर्थइस्टच्या मॅटो ग्रजिच याने मैदानावर घसरत त्याला रोखले. पाच मिनिटांनी ब्रॅंडन फर्नांडीसने ह्युगोला अप्रतिम पास दिला. डावीकडे बॉक्‍सपाशी ह्युगोला भरपूर संधी होती. त्याने नेटच्या दिशेने चेंडू मारला, पण त्यावेळी गोव्याचा फेरॅन गोरोमीनास किंवा मौर्तडा फॉल यांच्यापैकी कुणीच ही संधी साधू शकले नाही. त्यामुळे चेंडू बाहेर गेला. मॅस्कीयाला 21व्या मिनिटाला बॉक्‍सलगत चेंडू मिळाला. त्याने त्यावर फटका मारायचा प्रयत्न केला. ते शक्‍य नसल्यामुळे त्याने गॅलेगोला पास दिला. गॅलेगोने मारलेला फटका ताकदवान होता, पण त्यात अचूकता नव्हती.

जॅकीचंदने 23व्या मिनिटाला पास देताच कोरोने डाव्या पायाने मारलेला चेंडू बाहेर जाण्याची शक्‍यता होती, पण ह्युगोने तो नेटमध्ये आरामात मारला, पण त्याचवेळी ऑफसाईडचा इशारा झाला. रिप्लेमध्ये हा निर्णय अचूक असल्याचे दिसून आले, पण तोपर्यंत गोव्याच्या बेंचवरील खेळाडूंनी जल्लोष सुरु केला होता. दुसऱ्या सत्रात 48व्या मिनिटाला बार्थोलोम्यू ओगबेचे प्रयत्न करणार तोच ऑफसाईडचा इशारा झाला.

गोव्याने 11 सामन्यांत सहावा विजय मिळविला असून दोन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण झाले. गोव्याने जमशेदपूर एफसी (12 सामन्यांतून 19) आणि नॉर्थइस्ट यांना मागे टाकले. नॉर्थइस्टला 12 सामन्यांत दुसराच पराभव पत्करावा लागला. आधीच्या तीन सामन्यांत त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पाच विजय व पाच बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण आहेत, जे गोव्याइतकेच आहेत, पण नॉर्थइस्टचा गोलफरक 2 (16-14) आहे, तर गोव्याचा 10 (27-17) असा सरस आहे. बेंगळुरू एफसी (11 सामन्यांतून 27) आघाडीवर आहे, तर मुंबई सिटी एफसी (11 सामन्यांतून 21) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गोव्याची गेल्या तीन सामन्यांत बेंगळुरूकडून हार, एटीकेशी गोलशून्य बरोबरी, तर एफसी पुणे सिटीकडून हार अशी धक्कादायक कामगिरी झाली होती. घरच्या मैदानावरील यशासह सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने आपली मोहीम पुन्हा विजयी मार्गावर आणली. दुसरीकडे नॉर्थइस्टला तीनवरून चौथ्या क्रमांकावर घसरावे लागले.

निकाल :
एफसी गोवा ः 5 (फेरॅन कोरोमीनास 59, 84, एदू बेदीया 69, ह्युगो बौमौस 71, मिग्युएल फर्नांडेझ 90+1)
विजयी विरुद्ध नॉर्थइस्ट युनायटेड एफसी ः 1 (बार्थोलोम्यू ओगबेचे 90)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)