इंग्लंड सर्वच आघाड्यांवर सरस – विराट कोहली

दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करणे आवश्‍यक

साऊथहॅम्पटन: इंग्लंडच्या संघाने सर्वच आघाड्यांवर आमच्यापेक्षा सरस खेळाचे प्रदर्शन केले. विजयासाठी इंग्लंड संघ सर्वतोपरी पात्र होता, अशी कबुली भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्याच दिवशी संपलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील पराभवानंतर दिली आहे. इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 60 धावांनी पराभव झाला आणि त्यामुळे भारताने पाच कसोटी सामन्यांची मालिका 1-3 अशा फरकाने गमावली.

सामना आणि मालिकेतील पराभवानंतर बोलताना विराट म्हणाला, इंग्लंडच्या संघातील खेळाडू भारतापेक्षा चांगला खेळ करत आहेत. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले तर तळातील फलंदाज इंग्लंडचा डाव सावरायचा प्रयत्न करत आहेत. तसेच सॅम करनच्या रूपाने इंग्लंडला एक गुणी आणि उदयोन्मुख खेळाडू या मालिकेतून मिळाला आहे. तो चांगला फलंदाज तर आहेच. शिवाय चांगली गोलंदाजी करताना संघाला आवश्‍यक वेळी आश्‍वासक कामगिरी करतो आहे.
तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा आम्हाला सामना जिंकण्याची 50 टक्‍के खात्री होती. पण चौथ्या डावात आम्हाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही, असे सांगून कोहली म्हणाला की, इंग्लंडच्या संघानेही योग्य वेळी आमच्यावर दडपण आणले. दिवसभराचा खेळ अत्यंत चुरशीचा झाला. आमच्या फलंदाजांनी प्रयत्न केले, पण तेवढे पुरेसे नव्हते. इंग्लंडच्या संघाने उत्तम खेळ करताना आमच्या फलंदाजांना बाद करुन सामन्याचे गणित बदलले.

आम्ही जरी चौथ्या सामन्यासह ही मालिका गमावली असली, तरी आगामी पाचव्या सामन्यात आम्ही विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच उतरणार असून या पराभवानंतरही आम्ही खचलेलो नाहीत हे आम्ही आगामी सामन्यात दाखवून देऊ, असे सांगून भारतीय फलंदाजांचे समर्थन करताना कोहली म्हणाला की, त्या मैदानावर धावा करणे अवघड जात होते. आम्ही फार चुका केल्या नाहीत, मात्र इंग्लंडचा संघ जवळपास सर्वच आघाड्यांवर आमच्यापेक्षा सरस ठरला.

अजिंक्‍य रहाणेने दुसऱ्या डावात संघावरील दडपण दूर करण्यात मोठा हातभार लावला. ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली त्यामुळे मलादेखील खुलून खेळता आले. मात्र आम्हाला दोघांनाही जास्त वेळ तग धरता आली नाही. त्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या आणि दुसऱ्या डावात एका मोठ्या भागीदारीनंतर आमचे जवळपास सर्वच खेळाडू बाद होत गेले, असे सांगून कोहली म्हणाला की, मी जर पहिल्या डावात टिकून खेळलो असतो तर कदाचित आम्ही मोठी आघाडी घेण्यात यशस्वी झालो असतो. चेतेश्‍वर पुजाराच्या उत्कृष्ट खेळीमुळे पहिल्या डावात आम्हाला माफक आघाडी मिळाली. शेवटी आघाडी ही आघाडी असते. त्याने तुमचे मनोबल वाढते आणि तुम्ही प्रतिकारासाठी तयार होता.

तुम्ही एखादा सामना जिंकण्याच्या इतक्‍या जवळ पोहोचता आणि तरीही तुम्ही तो सामना गमावता. याला चांगला खेळ म्हणता येत नाही, तुम्हाला सामना जिंकता आला पाहिजे, तेव्हा त्याला महत्त्व प्राप्त होते आणि आमच्या संघातील खेळाडूंना हे शिकायला हवे. त्याचबरोबर आमच्या संघातील खेळाडूंना जर जिंकायचे असेल, तर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचे दडपण झुगारून खेळ करायला हवा. त्याशिवाय विजय मिळविणे अशक्‍य आहे, असे सांगून विराट म्हणाला की, तुम्ही आघाडीवर असता तेव्हा तुमचे मनोबल वाढते. मात्र, त्याचा फायदा तुम्हाला घेता यायला हवा. तुम्ही ते करायला शिकायला हवे, तेव्हाच तुम्ही जिंकू शकता.

सलामीवीरांचे अपयश भोवले

तिसऱ्या कसोटीत आघाडीवीरांनी दोन्ही डावांत भारताला अर्धशथकी सलामी दिली होती. चौथ्या कसोटीत मात्र दोन्ही डावात भारताचे सलामीवीर अपयशी ठरले आणि मधली फळी दडपणापुढे कोसळली. त्यामुळे चांगली संधी मिळूनही भारतीय संघाला विजय मिळवण्यात अपयश आले. दुसरीकडे दोन्ही डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या सलामीवीरांसह मधल्या फळीला लवकर बाद केले. मात्र तळातील फलंदाजांना बाद करण्यात त्यांना अपयश आले. याबद्दल विराट म्हणाला की, सामन्यात नकारात्मक असे फारसे काही घडले नाही. अशा गोष्टी घडतच असतात, मात्र आम्हाला त्यातल्या त्यात सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे वाटते. त्याचबरोबर विराट म्हणाला की, सामन्यात काय घडले याबद्दल त्यानंतर विचार करण्यापेक्षा किंवा त्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा सामन्यादरम्यान आम्ही परिस्थितीची जाणीव ठेवायला हवी. आम्ही जेव्हा सामन्यानंतर धावफलकाकडे पाहातो तेव्हा आम्हाला कळते की, आम्ही केवळ 50 किंवा 60 धावांच्या फरकावर आहेत. मात्र, आम्हाला हे सामन्यादरम्यान कळायला हवे. आमच्या खेळाडूंनी दडपण न घेता खेळ केल्यास आम्हाला विजय नक्‍कीच मिळेल याची मला खात्री आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)