इंग्लंडचा 58 धावांत खुर्दा; पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे 117 धावांची आघाडी

        पहिला दिवस-रात्र कसोटी सामना

ऑकलंड- ट्रेन्ट बोल्ट आणि टिम साऊदी यांच्या प्रभावी माऱ्यामुळे इंग्लंडचा 20 षटकांत केवळ 58 धावांमध्ये खुर्दा उडवताना न्यूझीलंडने आज सुरू झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यावर सलामीच्याच दिवशी वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावांत 3 बाद 175 धावा करताना 117 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली.

बोल्ट आणि साऊदीच्या वेगवान गोलंदाजीबरोबरच खेळपट्टीवरील समोर इंग्लंडचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बोल्टने 32 धावांत सहा, तर साऊदीने 25 धावांत चार फलंदाजांना तंबूत परतवले. इंग्लंडच्या संपूर्ण संघाला बाद करण्यासाठी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना केवळ 20.4 षटकेच लागली. या डावात इंग्लंडच्या पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. यामध्ये कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्‍ससारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.

नऊ बाद 27 अशी अवस्था असताना इंग्लंडसमोर सर्वबाद 45 या नीचांकी धावसंख्येचे आव्हान होते. परंतु क्रेग ओव्हरटनने नाबाद 33 धावांची सर्वोच्च खेळी केल्यामुळेच इंग्लंडचा संघ 50 धावांची मजल मारू शकला. ओव्हरटनने 25 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. तर सलामीवीर मार्क स्टोनमॅनने 20 चेंडूंत 10 धावांची खेळी केली. हे दोघेच दुहेरी धावसंख्या गाठू शकले.

प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंड संघाने आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 69 षटकांत 3 गडी गमावून 175 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सनने 177 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकारांसह नाबाद 91 धावा करताना टॉम लेथॅमच्या (26) साथीत दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. रॉस टेलर (20) अपयशी ठरला. परंतु विल्यमसनने हेन्‍री निकोल्सच्या (नाबाद 24) साथीत दिवसअखेर 52 धावांची अखंडित भागीदारी करीत न्यूझीलंडचे आव्हान कायम राखले.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड – पहिला डाव 20.4 षटकांत सर्वबाद 58 (क्रेग ओव्हरटन 33, ट्रेन्ट बोल्ट 6-32, टिम साऊदी 4-25),

न्यूझीलंड – पहिला डाव 69 षटकांत 3 बाद 175 (केन विल्यम्सन नाबाद 91, हेन्‍री निकोल्स नाबाद 24, जेम्स अँडरसन 2-32)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)