इंग्रजांना घाबरलो नाही, तुम्हाला काय घाबरणार?

अशोक चव्हाण : साडेचार वर्षात खोटी आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक

रायगड – केंद्र आणि राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारने गेल्या साडेचार वर्षात खोटी आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. आता पराभव समोर दिसू लागल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरायला लागली असून, पोलिसांचा वापर करून सरकार विरोधात बोलणा-यांचा आवाज दाबण्यासाठी दडपशाही सुरु आहे. त्यावेळी कॉंग्रेस कार्यकर्ते इंग्रजांना घाबरले नाहीत. ते मुख्यमंत्र्यांना दडपशाहीला काय घाबरणार?, असा टोला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी लगाविला. आगामी निवडणुकीत हे फसवणारे, खोटारडे, दडपशाही करणारे सरकार घालवून पुन्हा कॉंग्रेसचे सरकार आणा, असे आवाहन त्यांनी केले. पेण येथे जनसंघर्ष यात्रेच्या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेला बाळासाहेब थोरात, हुसेन दलवाई, बी. एम. संदीप, भाई जगताप आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चव्हाण म्हणाले, केंद्रातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. कॉंग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सरकार इतकं घाबरले आहे की जनसंघर्ष यात्रेतील प्रत्येक सभा, नेत्यांची भाषणे रेकार्ड करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पराभव समोर दिसू लागल्यानेच सरकार आता विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहे. साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक नयनतारा सहगल यांचे भाषण सरकारचा जातीयवादी, हुकुमशाही चेहरा उघडा पाडणारे होते म्हणून सरकारने आयोजकांवर दबाव आणून त्यांचे निमंत्रण रद्द करायला लावले. मंत्री विद्यार्थ्यांना धमक्‍या देत आहेत. राज्यातील सूज्ञ जनता ही दडपशाही सहन करणार नसून, येत्या निवडणुकीत भाजपला जागा दाखवली जाईल, असे ते म्हणाले.

सरकार जेएसडब्ल्यूसाठी काम करतेय

भाजप शिवसेनेने कोकणवासियांची मते घेतली. पण कोकणाच्या विकासासाठी काही केले नाही. मुख्यमंत्री पेणमध्ये येऊन पेण अर्बन बॅंकेची जमीन सिडकोमार्फत खरेदी करू व ठेवीदारांचे पैसे देऊ असे म्हणाले होते. अद्याप सिडकोने जमीन खरेदी केली ना ठेवीदारांचे पैसे मिळाले. पेण अर्बन बॅंकेत पैसे अडकलेल्या दीड लाखांपेक्षा जास्त खातेदारांची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पासाठी शेतक-यांच्या जमीनी घेतल्या पण त्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही. हे जेएसडब्ल्यूसाठी काम करत आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)