आ. राम कदमांच्या पुतळ्याचे केले दहन

राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी तावडे, जानकरांना विचारला जाब
 विधानसभेतून बडतर्फ करण्याची मागणी
सातारा, दि. 5 प्रतिनिधी – भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींच्याबाबत केलेल्या विधानांवर बुधवारी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना जाब विचारत फैलावर घेतले. त्यावर आ. कदम यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगून गृहखाते त्यांच्यावर कारवाई करेल, अशी सारवासारव दोन्ही मंत्र्यांनी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आ. राम कदमांच्या पुतळ्याचे दहन करत निषेधाच्या घोषणा दिल्या.
आ. राम कदम यांनी मुलींना पळवून आणण्या बाबत जे विधान केले त्याचा राज्यभरात निषेध केला जात आहे. साताऱ्यात ना. तावडे व ना. जानकर हे राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या मेळाव्यांच्या निमित्ताने साताऱ्यात दाखल झाले होते. साहजिकच यावेळी चित्रा वाघ यांनी दोन्ही मंत्र्यांना घेरण्याची संधी सोडली नाही. त्यांनी बुधवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर महिला पदाधिकाऱ्यांसोबत जात उपस्थित ना. तावडे यांना सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणून आ. कदम यांच्या विधानांवर तुमची काय भूमिका आहे, असा जाब विचारला. त्यावर सुरूवातीला ना. तावडे यांनी, आ. कदम यांचे विधान यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही ते चुकीचे आहे, अशी स्पष्ट कबुली दिली. तसेच मी सांस्कृतिक खात्याचा मंत्री असून मी माझ्या भावना मांडल्या आहेत. मात्र, आ. कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई काय होवू शकते हे गृहखाते ठरवेल, अशी सारवासारव करणारी उत्तरे दिली. त्यानंतर चित्रा वाघ विश्रामगृहाच्या आवारात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी आ. कदमांना मुली पळवून आणायला त्यांना त्या वस्तू वाटतात का? असा सवाल उपस्थित करत असतानाच त्या ठिकाणी ना. जानकर हे वाहनातून जावू लागले. त्यावर वाघ यांनी जानकर साहेब तुम्हाला असे पळून जाता येणार नाही, नुसते धनगर आरक्षणापुरते भांडू नका असे ही सुनावले. त्यावर ना. जानकर यांनी मी सावित्रीच्या जिल्ह्यात आहे, असे सांगताच वाघ म्हणाल्या, नुसते सावित्रींचे नाव घेवू नका, लेकींचे काय चाललय हे पण बघा. चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावर जानकरांनी कदम यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगितले. त्यावर वाघ यांनी कारवाई होइपर्यंत आमचे लक्ष असेल असा सूचक इशारा जानकर यांना दिला. दरम्यान, यावेळी वाघ यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधताना, आ. राम कदमांचा उल्लेख हा राम नव्हे तर विलासी राम आहे. असल्या आमदारांची पुरोगामी महाराष्ट्राला गरज नाही. त्यांना तात्काळ विधानसभेतून बडतर्फ करा, अशी मागणी केली. तद्‌नंतर सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवन परिसरातील पारंगे चौकात आ. राम कदम यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, नंदिनी जगताप, नलिनी जाधव, कुसुमताई भोसले, सुजाता घोरपडे, सीमा जाधव, सुवर्णाताई पवार, सुरेखा निवडुंगे, सुनिता शिंदे, पुजा काळे, श्‍वेताली मोहिते, रूपाली भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)