आ. गोरेंच्या रणनीतीपुढे राष्ट्रवादीचा डाव फसला

सच्च्या कार्यकर्त्याला मिळाली नगराध्यक्ष पदाची भेट 
अंतर्गत बंडाळीचा राष्ट्रवादीला फटका

नितीन राऊत
वडूज – वडूजच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये कॉंग्रेसकडे 5, तीन अपक्ष असतानाही राष्ट्रवादीचे एक मत फिरले व डॉ. महेश गुरव यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडली. निवडीआधी आ. जयकुमार गोरे यांच्या रणनितीमुळे राष्ट्रवादीचा डाव फसला व सच्चा कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची भेट मिळाली. निवडीत राष्ट्रवादीच्याच महिला नगरसेविका सुनीता कुंभार यांनी राष्ट्रवादीला मत न देता कॉंग्रेसचे डॉ. महेश गुरव यांना मत दिले.

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या काही महिन्यातच संपणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्या सहा महिन्यांकरिता या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, बेरजेच्या जुळवाजुळवीमुळे निवडीचे वातावरण चांगलेच तापले होते. या हालचालीत डॉ. महेश गुरव यांच्यासह काही नगरसेवक मात्र वडूजमधून आऊट ऑफ कव्हरेज झाले होते. नगरपंचायतीच्या 17 सदस्यांपैकी कॉंग्रेसकडे 5 राष्ट्रवादीकडे 5, भाजपा 3 तर 4 अपक्ष आहेत. शोभा माळी यांच्या निवडीवेळी राष्ट्रवादीचे 5, अपक्ष 4, भाजप 3 सदस्य अशी बेरीज करण्यात आली होती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी डॉ. महेश गुरव व अनिल माळी यांनी अर्ज दाखल केला होता.

डॉ. गुरव हे काही नगरसेवकांसह आऊट ऑफ कव्हरेज झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. निवड प्रक्रियावेळी अनिल माळी यांच्याकडे भाजपचे तीन, राष्ट्रवादीचे चार तर अपक्ष एक अशी मतांची बेरीज झाली. डॉ. महेश गुरव यांनी पाच कॉंग्रेस, तीन अपक्ष व एका राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मताने विजय मिळविला.

खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांची अंडर ट्रीटमेंट झाल्याने डॉ. महेश गुरव यांनी केलेले उपचार यशस्वी ठरले. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, अपक्ष नगरसेवक शाहजीराजे गोडसे यांनीही डॉ. गुरव यांच्यासाठी ताकद पणाला लावली होती.

नगरसेवकांच्या ट्रिपमध्येच ठरला अंतिम निर्णय
नगराध्यक्ष पदाची निवड दोन चार दिवसावर आली होती. याचवेळी कॉंग्रेसचे पाच सदस्य, राष्ट्रवादीचे एक सदस्य व तीन अपक्ष ट्रिप साठी बाहेर पडले होते. कुणाला मदत करून कुणाच्या ताब्यात खुर्ची द्यायची यासाठी मोकळ्या ठिकाणी चर्चा होऊन शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची कुजबूज होती. या सदस्यांनी घेतलेला निर्णयच वडुजकरांना पाहायला मिळाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)