आहे तरी काय पुण्यात?

ह्या साध्याशा प्रश्‍नाचं आजच्या कालानुरूप उत्तर द्यायचा प्रयत्न करतेय. बघा पटतंय का?
पुण्यात बॉयकट केलेल्या (केस कापलेल्या वेगळ्या, केसांचे कट्‌स असलेल्या वेगळ्या, बॉयकट केलेल्या वेगळ्या बरं..) पुष्कळ स्त्रिया रस्त्यावर दिसू शकतात. स्त्रियांनी किती बारीक केस ठेवावेत, ह्याचे स्वातंत्र्य म्हणून मी बॉयकट स्पेसिफिकली म्हणते आहे.

एखाद्या शहराला जोखायचा माझा निकष आहे हा. अनेक स्त्रिया वेगवेगळ्या पेहेरावात सकाळी सकाळी त्यांच्या स्वास्थ्यासाठी (पोरांना शाळेत सोडायला बाहेर पडणाऱ्या वेगळ्या) व्यायाम करायला पायात नीटसे शूज घालून बाहेर पडलेल्या दिसतात. कार, प्रॉपर बाईक (कोणतीही दुचाकी नव्हे) चालविणाऱ्या स्त्रिया भरपूर दिसतात रस्त्याला. नोकरदार स्त्रिया, व्यावसायिक स्त्रिया, रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्या स्त्रिया जागोजागी दिसतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्यमवर्गीय समलिंगी, उभयलिंगी लोकांना त्यांच्या त्यांच्या कम्फर्टमध्ये स्वतःचा लैंगिक प्रेफरन्स जाहीर करून देखील समजून घेणारे वातावरण काही काही समाज घटकांत तरी जाणवते आहे. गरीब आणि श्रीमंत ह्यांना काही गोष्टी आपसुक सुखाने भोगता येतात. मध्यमवर्गीय लोकांची समाज काय म्हणेल ही गोची होते, तो हा विषय. वेगळ्या लैंगिकतेला आणि त्या अल्पसंख्यांना बऱ्यापैकी समजून घेणारे शहर म्हणून मला पुणे आवडते. सुशिक्षित मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात इथे नांदत असल्याने शिक्षणापलिकडे एक समज, शहाणपण असते, ते जाणवून देणारे शहर आहे हे. शहाणपण आणि एलिट ही तिसरी मला दुर्मिळ वाटणारी मंडळीदेखील इथे शोधली तर सापडतात.

गाव खेड्यासारख्याच पण थोड्या आधुनिक सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी जाण्या-येण्यात मुंबई इतके बेहाल न होता भरपूर, पुरेपूर पैसे कमवायची संधी देणारे शहर म्हणजे पुणे. कोणत्याही क्षेत्रातील बौद्धिक भूक छान भागवणारे शहर.

पुणे एखाद्या स्पेसिफिक पदार्थासाठी प्रसिद्ध असलेले मला तरी माहीत नाही. इथे लोकसंख्या वाढल्याने, धंदा करायचा म्हणून काही सुरू केलेले ब्रॅंड्‌स असतील, आहेत. पण नागपूरची संत्री, सोलापूरची शेंगा चटणी, साताऱ्याचे कंदी पेढे, जळगावची केळी, नाशिकची द्राक्षे, तसे पुण्याचे काय, हा प्रश्‍न पडतो. एकूणच अन्न महाग पडते, त्याचा दर्जा कमी असतो हे माझे निरीक्षण आहे. अन्नाची विविधता आणि उपलब्धता हा मुद्दा नाही. पुण्याच्या कानाकोपऱ्यात निरनिराळे कार्यक्रम निरनिराळ्या विषयांत, कलेत, विविध गटांसाठी रोज सुरू असतात. काही तिकीट लावून, तर खूप सारे विना तिकीट, खुली एन्ट्री असलेलेसुद्धा. अशा पैसे न देता समृद्ध करणाऱ्या शक्‍यता एखाद्या व्यासंगी पण गरीब व्यक्तीला एखाद्या शहरात सहज उपलब्ध असणे, हे छान आहे. पुण्याच्या पाट्या, पुण्यावरचे गुळमुळीत जोक्‍स, सदाशिव पेठ मोठी करणे, तीच नाही मोठी आणखीन कोणत्या पेठा, जागा मोठ्या आहेत असले वाद, इथल्या लोकांच्या तुसडेपणावरचे जोक्‍स, इथला इतिहास उगाळत बसणे, स्वतःचे कर्तृत्व शून्य असतांना इतिहासाचे दाखले येता जाता देणे आणि फाटक्‍या फुग्यात अस्मिता बिस्मिता हवा भरणे, विद्यानगरी वगैरे अभिमान बाळगणे… हे सगळेच सोडून दिले पाहिजे. माझ्यासाठी पुण्याची ओळख म्हणजे स्वतंत्र, स्मार्ट, स्वयंनिर्भर स्त्रिया मोठ्या संख्येने दिसू शकणारे शहर. लैंगिक अल्पसंख्याना मोकळा श्‍वास घेऊ देणारे शहर. बौद्धिक भूक भागविणारे शहर आणि माहिती पलिकडे जाणतेपणाकडे जायचा रस्ता दिसायची संधी असणारे शहर.

– प्राची पाठक 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)