आहार विधी (भाग एक)

काही वर्षांपूर्वी घरामध्ये नेहमी केले जाणारे शिकरण आता बाद होऊन त्याची जागा मिल्कशेक्‍सनी घेतली आहे. हे मिल्कशेक्‍स चवीला चांगले लागतात; परंतु काही विशिष्ट फळांपुरता मिल्कशेकचा विचार चांगला आहे. त्यातल्या त्यात आंबा+दूध, चिक्‍कू+दूध याचे केलेले मिल्कशेक्‍स हे त्रासदायक नाहीत; परंतु आता स्ट्रॉबेरी मिल्कशेक, स्ट्रॉबेरी मस्तानी म्हणजेच अगदीच कहर झाला. मुळात पूर्ण आंबट चवीची स्ट्रॉबेरी आणि त्यात तिचा दुधाबरोबर संयोग म्हणजे अगदी चुकीचे!

सहाही रसांचे गुण, त्या रसांनीयुक्‍त विविध अन्नपदार्थ, त्यांच्या सेवनाने शरीराला होणारे उपयोग, चांगले परिणाम, त्यांची आहारातली प्राधान्यता, त्यांच्या अतिसेवनामुळे शरीरावर घडणारे दुष्परिणाम किंवा रोग यांची बरीचशी माहिती आपण घेतली.

 षड्‌सं मधुरप्रायम्‌…

-Ads-

नीरस (म्हणजे रस नाही किंवा कुठलीच चव नाही असे द्रव्य (म्हणजे पृथ्वीवरील कोणताही पदार्थ) या भूतलावर नाही. मधुर, अम्ल, लवण, तिळ, कटु, कजाय या सहा रसांपैकी एक किंवा अनेक मिश्र रसयुक्‍त म्हणजेच मिश्र चवीचा किंवा एकेरी चवीचा पदार्थ हा असतोच.

 हिताहितं सुखं दुखम्‌…

आयुर्वेदाचा मूळ उद्देशच आयुष्याला हितकर काय होईल या दृष्टीने विचार करण्याचा आहे. त्यातही आहार सेवन हा आयुष्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा!
त्यामुळे षड्‌स (सहा रसयुक्‍त) आहार घेताना सुद्धा प्राय: म्हणजेच प्रामुख्याने गोड आहार असावा असा शास्त्रोल्लेख आहे. गोड रसाचा आणि लघु असा आहार प्रामुख्याने घ्यावा. हे समजून घेताना जे पदार्थ गोड आहेत आणि हलके आहेत, अशा पदार्थांचा समावेश आहारात असावा.

गोड याचा अर्थ फक्‍त साखर, गूळ किंवा तत्सम गोड चवीचे पदार्थच फक्‍त खायचे, असा अर्थ अजिबात नाही हे आधी समजून घेतले पाहिजे.साखर, गूळ हे पदार्थ तर गोड आहेतच. पण उदाहरणादाखल आपण जे मधुर पदार्थ आहेत, ते थोडेसे बघू. याला आयुर्वेदात मधुरस्कंध म्हणजे मधुर पदार्थांचा गट/गण असे म्हटले आहे.तूप, गूळ, अक्रोड, नारळ, शतावरी, गोड तोंडली, दुधी भोपळा, भुईकोहळा, दूध, ऊस (साक्षात्‌ साखरेचा स्रोत) गोखरू, मध इ.

फळांपैकी केळे, द्राक्षे हे मधुर रसांचे अन्नपदार्थ आहेत. खजूर, उडीद, शिंगाडा, गहू साठेसाळीचा तांदूळ (हा विशेष), मासे (काही प्रकारचे), खरवस, चारोळी असे अनेक पदार्थ हे मधुररसाचे होत.त्यानुसार “मधुरप्राय’ म्हणजे या प्रकारचे अन्नपदार्थ हेच प्रामुख्याने जेवणामध्ये असावेत.अन्नपदार्थ “लघु’ म्हणजे पचनाला हलके असे पण असावेत. त्यामुळे वर उदाहरणादाखल दिलेल्या पदार्थांमध्ये गहू साठेसाळीचा तांदूळ हे शरीरास उपकारक, शरीराची शक्‍ती टिकवणारे असे मधुर रसाचे पदार्थ आहेत. इथेसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जसे व्यवहारात म्हणतो की, जुना तांदूळ चांगला.कारण नवीन काढलेला तांदूळ हा पचायला जड असतो.

   मधुरं श्‍लेष्मलं प्राय:

मधुर रसाचे पदार्थ हे मुख्य करून शरीरामध्ये कफाची उत्पत्ती करतात; परंतु शास्त्रानुसार चांगला वर्षभर जुना मुरलेला तांदूळ, मूग, गहू, मध, जव काही प्राण्यांचे मांस हे मधुररसांचे पदार्थ असले तरी ते शरीरात कफाची उत्पत्ती करत नाहीत. कारण हे पदार्थ पचायला हलके असतात.

आपण व्यवहारात पण पाहतो की, हे पदार्थ रोजच्या जेवणात असल्याने शरीरास हानी काहीच होत नाही. उलट शक्‍ती प्राप्त होते.रसांच्या सेवनाच्या बाबतीत विचार करताना जसे मधुररसाचे सांगितले. तसेच इतरही रसांबाबत विशेष उल्लेख आयुर्वेदशास्त्रात आहेत. ते समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल की, पूर्वीच्या शास्त्रकारांचा दृष्टिकोन किती सखोल, व्यापक अभ्यासपूर्ण होता. आपण शास्त्रानुसार समजून घेऊ या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)