‘मंत्र’ शब्द उच्चारताच आपण विविध गोष्टींशी कनेक्ट होत जातो, जसे एखाद्याचा जीवन जगण्याचा ‘मंत्र’, कुणाचा सक्सेस ‘मंत्र’, एखाद्याने दिलेला गुरु ‘मंत्र’ किंवा कुणी दिलेला कान’मंत्र’ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या धार्मिक ग्रंथात असलेले विविध ‘मंत्र’ आपल्याला आठवतात. असाच एक सामान्य माणसांच्या जगण्याशी निगडीत चित्रपट ‘मंत्र’ दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
मंत्र ही निरंजन (सौरभ गोगटे) या पुरोहिताच्या घराण्यात जन्मलेल्या, आजच्या तरुण मुलाच्या देव आणि धर्म यांच्या तार्किक स्पष्टीकरणापर्यंत होणाऱ्या प्रवासाची गोष्ट आहे. श्रीधरपंत (मनोज जोशी) हे त्याचे वडील प्रामाणिकपणे पौरोहित्य करीत आहेत पण त्यातील कमी उत्पन्न आणि सन्यस्त आयुष्य पाहून निरंजन CA होण्याची तयारी करत असतो. जर्मनी मध्ये एका पुरोहिताच्या जागेची संधी येताच त्याचे मित्र त्याला काही काळ भरपूर पैसे कमाविण्यासाठी ते काम घ्यायला सुचवतात. खूप पटत नसलं तरी निरंजन तसे करायला तयार होतो आणि त्याला पंतही होकार देतात.
या मार्गावर पुढे त्याला अंतरा (दीप्ती देवी) भेटते. अंतरा एक खूप मुक्त विचारांची मुलगी आहे. पण काही ठोस कारणांमुळे ती कर्मकांड आणि धार्मिक गुरूचा तिरस्कार करते. निरंजनला तिच्याबद्दल आकर्षण वाटत असतानाच ती नास्तिक आहे हेही त्याला कळत. स्वतः पुरोहित असल्याच सत्य तो तीला सांगू शकत नाही पण अपघाताने ही गोष्ट अंतराला कळते. दरम्यान, निरंजन मित्रांच्या वर्तणुकीमुळे धर्म आणि देवाच्या राजकीय वापरालाही सामोरे जातो. पुढे काय होता हे जाणून घेण्यासाठी ‘मंत्र’ बघायला हवा.
लेखक, दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी ‘मंत्र’च्या माध्यमातून आजच्या तरुणाईचा अध्यात्मिक विषयावरचा गोंधळ नेमकेपणाने मांडला आहे. या चित्रपटात अभिनेता सौरभ गोगटे आणि दीप्ती देवी प्रमुख भूमिकेत आहेत. दीप्तीने साकारलेली अंतरा ही प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारलेली मुलगी आहे, आजच्या पिढिला धर्माबद्दल नेमके काय वाटते याचे प्रतिनिधीत्व करणारी अंतरा आपल्याला अंर्तमुख व्हायला भाग पाडते. सौरभने साकारलेला निरंजन कुठेतरी प्रत्येकामध्ये दडलेला असतो, यामुळे तो लक्षात राहतो. पुष्कराज चिरपुटकर पुरोहिताच्या भूमिकेत आहे, काशिनाथ ही भूमिका त्याने जिवंत केली आहे. अभिनेते मनोज जोशी हे हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत, त्यांनी साकारलेले श्रीधरपंत हे सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेउन गेले आहेत. या शिवाय इतर कलाकारांचा अभिनयही चांगला आहे.
‘मंत्र’ या चित्रपटला अविनाश – विश्वजित या संगीतकार जोडीने संगीत दिले आहे. धर्म, रूढी – परंपरा यावर भाष्य करणारे अनेक सिनेमे यापूर्वी आले आहेत, ‘ओ माय गॉड ’ आणि ‘पीके’ या दोन्ही सिनेमामध्ये धर्म, रूढी – परंपरा यामधील आजच्या काळाच्या दृष्टीने वाईट गोष्टीवर भाष्य करण्यात आले होते, पण या सिनेमांनी न मांडलेली दुसरी बाजू मांडणारा ‘मंत्र’ बघायला काहीच हरकत नाही.
चित्रपट – मंत्र
निर्मिती – ड्रीमबुक प्रॉडक्शन्स, वेदार्थ क्रिएशन्स
दिग्दर्शक – हर्षवर्धन
संगीत – अविनाश – विश्वजित
कलाकार – सौरभ गोगटे, दीप्ती देवी, मनोज जोशी, सिद्धेश्वर झाडबुके, सुनील अभ्यंकर, धीरेश जोशी, राजेश काटकर, शुभंकर एकबोटे, सुजय जाधव
-भूपाल पंडित