आसिया बिबी प्रकरणात आंदोलन करणाऱ्या इस्लामिक धर्मगुरूला पाकिस्तानात अटक 

लाहोर – ईश्‍वर िंनंदेच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेल्या आसिया बिबी नावाच्या महिलेला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच निर्दोष मुक्त केले आहे. तिच्या सुटकेच्या विरोधात रविवारी निषेध दिन पाळण्याचा आदेश देणारे एक इस्लामिक धर्मगुरू खदिम हुसेन रिझवी यांना त्यांच्या सुमारे शंभर समर्थकांसह आज पोलिसांनी अटक केली.

रिझवी हे तहरीक ई लब्बाईक पाकिस्तान या कडव्या धार्मिक संघटनेचे प्रमुख आहेत. त्यांनी रविवारचा आपला बंद मागे घ्यावा अशी विनंती पोलिस व प्रशासनाने त्यांना केली होती. पण त्यांनी त्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी आज त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.

-Ads-

सार्वजनिक मालमत्ता आणि लोकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही त्यांच्यावर ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे असे पाकिस्तानचे माहिती मंत्री फव्वाद चौधरी यांनी सांगितले. तथापी त्यांच्या अटकेचा आसिया बिबी प्रकरणाशी कोणताही संबंध नाही असे त्यांचे म्हणणे आहे. धर्माच्या नावाने त्यांच्या संघटनेने देशातील सार्वजनिक हिताला मोठे आव्हान निर्माण केले होते त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करणे भाग पडले आहे असे ते म्हणाले. रविवारचा बंद मागे घेण्यासाठी आम्ही त्यांचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला जुमानले नाही त्यामुळे आमचा नाईलाज झाला असेही चौधरी यांनी म्हटले आहे.

रिझवी यांना अटक करताना पोलिस व त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यात तीन पोलिस कर्मचारी आणि त्यांचे सात समर्थक जखमी झाले. आसिया बिबी यांना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या तीन न्यायाधिशांच्या खंडपीठाने दिला आहे त्या न्यायाधिशांना ठार मारण्याचा आदेशही रिझवी यांनी दिला होता. तसेच लष्कर प्रमुख कमर जावेद बाज्वा हे बिगर मुस्लिम असल्याने लष्कराच्या अन्य मुस्लिम अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात बंड करावे असे जाहीर आव्हानही त्यांनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)