आसाराम बापूवर होणार उद्या फैसला…

जोधपूर : अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या एका प्रकरणात जोधपूरमधील न्यायालय उद्या म्हणजेच 25 एप्रिल रोजी आरोपी आसाराम बापूवर निकाल देणार आहे. हा निकाल येण्याआधीच दिल्लीपासून जोधपूरपर्यंत सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राम रहीमचा निकाल आल्यानंतर ज्याप्रकारे त्याच्या अनुयायांनी हैदोस घातला, तशीच परिस्थिती यावेळीही होण्याची शंका पोलिसांना आहे.आसाराम दोषी ठरल्यास त्याचे समर्थक गोंधळ घालू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वत्र कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

जर या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवले तरी तो तुरुंगातून सुटणार नाही. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे. जोधपूरचे पोलिस आयुक्त अशोक राठोड यांनी सांगितले की, “निकालाच्या दिवशी बापूचे हजारो अनुयायी जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी लावण्यात आली आहे.”

निकालानंतर दिल्लीपासून राजस्थानपर्यंत कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवू नये यासाठी दोन्ही राज्यांच्या सरकारने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दिल्ली पोलिस पूर्णत: अलर्ट आहे. तर जोधपूरमध्येही कलम 144 लावण्यात आले आहे. कुठेही लोकांचा जमाव दिसला की कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दिल्ली पोलिसातील अधिकारी उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांशी संपर्कात आहेत. पोलिसांनी लोकल इंटेलिजन्सद्वारे आसारामचे आश्रम आणि त्याच्या समर्थकांच्या हालचालींवर नजर ठेवल्याचा दावा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)