आसाराम बापूचा आज फैसला ; तीन राज्यांच्या सुरक्षेत वाढ

जोधपूरमध्ये जमावबंदी लागू

जोधपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या एका प्रकरणात जोधपूरमधील न्यायालय आज आरोपी आसाराम बापूवर निकाल देणार आहे. हा निकाल येण्याआधीच दिल्लीपासून जोधपूरपर्यंत सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या तीन राज्यातील सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे.

राम रहीमचा निकाल आल्यानंतर ज्याप्रकारे त्याच्या अनुयायांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार घडवून आणला होता, तशीच परिस्थिती यावेळीही होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आसाराम दोषी ठरल्यास त्यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्व तयारी केली आहे.

पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 15 आणि 16 ऑगस्ट 2013 च्या रात्री जोधपूरच्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केले होते. याप्रकरणी दिल्लीच्या कमलानगर पोलीस स्टेशनमध्ये 19 ऑगस्ट 2013 रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवले तरी तो तुरुंगातून सुटणार नाही. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे. जोधपूरचे पोलीस आयुक्त अशोक राठोड म्हणाले, “निकालाच्या दिवशी बापूचे हजारो अनुयायी जोधपूरमध्ये येण्याची शक्‍यता आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी लावण्यात आली आहे.
निकालानंतर दिल्लीपासून राजस्थानपर्यंत कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवू नये यासाठी दोन्ही राज्यांच्या सरकारने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

दिल्ली पोलीस पूर्णत: अलर्ट आहे. तर जोधपूरमध्येही कलम 144 लावण्यात आले आहे. कुठेही लोकांचा जमाव दिसला की कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली पोलिसातील अधिकारी उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांशी संपर्कात आहेत. पोलिसांनी लोकल इंटेलिजन्सद्वारे आसारामचे आश्रम आणि त्याच्या समर्थकांच्या हालचालींवर नजर ठेवल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, आसाराम बापूवर भारतीय दंडविधान कलम 342, 376, 354-अ, 506, 509/34, जेजे ऍक्‍ट 23 आणि पोक्‍सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला इंदूरमधून 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक केली होती. तेव्हापासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)