आष्टीकरांच्या रजेमुळे मिसाळ यांचे आंदोलन महिनाभर स्थगित

पिंपरी- महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त आष्टीकर यांच्या कार्यशैलीबाबत आक्षेप घेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सदस्य राजू मिसाळ यांनी केली होती. अन्यथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आष्टीकर महिनाभराच्या रजेवर गेल्याने ते स्थायीच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आष्टीकर येईपर्यंत हे आंदोलन स्थगित केले आहे.

स्थायी समितीच्या गेल्या आठवड्यातील बैठकीत मिसाळ यांनी थेट आयुक्त हर्डीकर व आष्टीकर यांच्या कार्यशैलीवर हल्ला केला होता. आष्टीकर यांनी भांडार विभागाचे अक्षरश: दुकान केले आहे. त्यांच्याबद्दल अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतानादेखील आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांना वारंवार पाठिशी घालत आहेत. त्यांच्यावर कारवाई न केल्यास आज (दि.30) आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. दरम्यान, संतोष पाटील यांनी सोमवारी (दि.29) अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार घेतल्यानंतर आष्टीकर एक महिन्याच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे आजच्या स्थायीच्या बैठकीला आष्टीकर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आष्टीकर पुन्हा महापालिकेत रुजू होईपर्यंत मिसाळ यांनी हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती पत्रकारांना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)