आषाढ श्रावणी फुलली रानफुले

निगडी, दि.8 (वार्ताहर) – मुरमाड आणि खडकाळ जमीन काही उगवण्यासाठी योग्य मानली जात नाही, परंतु निसर्गाची कमाल वेगळीच असते. मुरमाड आणि खडकाळ जमिनीतही मन प्रसन्न करणारी रानफुले उगवण्याचे सामर्थ्य त्यात असते. कोणतीही पेरणी आणि मशागत न करता मन मोहून घेणारी रानफुले शहरात सध्या कित्येक ठिकाणी दिसून येत आहेत. स्थानिक पर्यावरणाचे सातत्याने अध्ययन करणाऱ्या एका संस्थेने नोंदवलेल्या निष्कर्षानुसार यावर्षीच्या आषाढामध्ये दरवर्षीच्या तुलनेत अधिक रानफुले उमलली आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरावयास आलेल्या नागरिकांचे सदरची रंगीबेरंगी रानफुले लक्ष वेधून घेत आहेत.

गेल्या चार वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातील एक अभ्यास गट पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आषाढ व श्रावण महिन्यात फुलणाऱ्या रानफुलांचा अभ्यास करीत आहेत. या समितीने नोंदवलेल्या निष्कर्षानुसार शहरातील दुर्गा टेकडी परिसर, आकुर्डी ते चिंचवड रेल्वेरूळ टेकडीवजा परिसर, प्राधिकरणातील मुरमाड व खडकाळ मोकळ्या जागेतील काही परिसर, उद्याने, पवना व इंद्रायणी नदीकाठावरील काही मुरमाड भाग या ठिकाणी दरवर्षी च्या तुलनेत ह्या वर्षी रानफुलांमध्ये वाढ झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समिती पर्यावरण विभागाचे विजय मुनोत, संतोष चव्हाण, अर्चना घाळी, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, विशाल शेवाळे, नितीन मांडवे, अजय घाडी, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे हे समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रानफुलांचा अभ्यास करीत आहेत. अभ्यासाअंती काही महत्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या आहेत.

अन्नसाखळीसाठी पर्वणी
प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील मुरमाड मातीमध्ये तब्बल चार वर्षाच्या कालखंडानंतर अभ्यासकांना पिवळी चटकदार गवत प्रजातीमधील पिवळी फुले, तेरडा, कोरांटी, कंकर, तगर, गोकर्ण, वडेलिया, दगडी पिवळी फुले फुललेली आढळली. यावर्षी पावसाच्या सरी समाधानकारक कोसळल्यामुळे रानफुले मुरमाड जागेतसुद्धा बहरली असल्याचे दिसून येत आहेत. किटकप्रणालीची नैसर्गिक अन्नसाखळी भक्कम होण्यासाठी रानफुलांची महत्वाची भूमिका असते. फुलपाखरू तसेच मधमाश्‍यांसाठी रानफुले ही अन्नसाखळीस पर्वणीच ठरते. परागिकरणासाठी ही रानफुले मोठी भूमिका बजावत असतात.

दुर्मिळ आणि उपयोगी
अतिशय दुर्मिळ मानली जाणारी तगर आणि दगडी फुल या प्रजातीतील फुले ही यंदा बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहेत. या फुलांमध्ये कित्येक नैसर्गिक गुण आहेत. याबाबत अद्याप पूर्ण माहिती नसली तरी जेवढी माहिती आहे, ती देखील मनुष्य आणि पर्यावरणासाठी खूपच उपयुक्‍त आहे. सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी वेगवेगळ्या रानफुलांचा उपयोग होतो. तसेच फुलपाखरांसाठी ही रानफुले अत्यंत उपयुक्‍त आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने रानफुलांच्या वाढीसाठी व संवर्धनासाठी विशेष मोहीम दरवर्षी राबविली पाहिजे व त्याचप्रमाणे उद्यानांमध्ये रानफुले संवर्धन होण्याकरिता उपाययोजना राबविल्या पाहिजेत.
विजय मुनोत, पर्यावरण अभ्यासक

प्राधिकरणातील भौगोलिक परिस्थिती, तसेच मुरमाड भूभाग हा रानफुलांसाठी पोषक आहे. तसेच सुनियोजित उद्यानांमुळे रानफुलानां मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाली आहे. पालिकेने योग्य नियोजन केल्यास भविष्यात रानफुलांच्या प्रजातींमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते.
विजय पाटील, अध्यक्ष, पर्यावरण समिती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)