अग्रलेख | आश्‍चर्यकारक विजय

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्व प्राप्त झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देदीप्यमान आणि आश्‍चर्यकारक विजय मिळवून साऱ्यांनाच चकीत केले आहे. भाजपला मिळालेला हा विजय त्यांच्या एकूणच इलेक्‍शन स्ट्रॅटेजीचा उत्तुंग आविष्कार मानला पाहिजे. अनेक अर्थाने भाजपच्या या विजयाला महत्त्व आहे. वास्तविक कर्नाटकातील निवडणुकीचे वातावरण पाहता तेथे भाजपला विजय मिळणे तसे दुरापास्तच मानले गेले होते. कॉंग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तुलनेने केलेला चांगला कारभार, भाजपच्या प्रचार-अपप्रचाराला त्यांनी वेळच्यावेळी दिलेली चोख उत्तरे, राहुल गांधी यांच्या प्रचारांना मिळणारा तुफानी प्रतिसाद अशा साऱ्या कॉंग्रेस अनुकुल वातावरणात भाजपने इतका मोठा विजय मिळवणे हा एक राजकीय चमत्कारच मानावा लागेल.

कर्नाटकातील विजयाच्या आधारावर कॉंग्रेसला पुढची गणिते सोपी गेली असती मात्र, धक्‍कादायक पराभवाने कॉंग्रेस नेतृत्व आणि पक्ष कार्यकर्त्यांचे जे मानसिक खच्चीकरण झाले आहे त्यातून त्यांना उभारी घ्यायला खूप वेळ लागेल. सततच्या पराभवाने राहुल गांधींचा पक्ष संघटनेवरील धाकही कमी होऊ शकतो. किंबहुना त्यांच्या विरोधात पक्षातच बंडासारखी स्थिती निर्माण होण्याचा धोकाही उद्‌भवू शकतो त्यामुळे यापुढील काळ राहुल गांधींसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.

भाजपच्या कर्नाटकातील स्थानिक नेत्यांनाही इतक्‍या मोठ्या विजयाची अपेक्षा नसावी. त्यांच्या काही स्थानिक नेत्यांचा एक फेसबुक संवाद गेल्याच आठवड्यात लीक झाला होता. त्यात भाजप 60 जागांवरच अडखळेल असे त्यांनी मान्य केल्याचे वाचनात आले होते पण तरीही अशा वातावरणात भाजपने मिळवलेला हा विजय निश्‍चितच लक्षणीय आहे. हा चमत्कार भाजपने नेमका कशाच्या आधारे घडवला याचे आकलन अजून कोणाला झालेले नाही. शेवटच्या टप्प्यातील मोदींच्या सभांमुळे वातावरण फिरले हे खरे आहे. पण ते भाजपला निर्णायक विजय मिळवून देणारे असेल काय? याची शंका होती. पण भाजपला निर्विवाद यश मिळाले. हा मोदींच्या व्यक्तिगत प्रभावाचा परिणाम आहे असे कोणीही म्हणू शकेल. पण मोदींच्या सभांमधील भाषणांचा आढावा घेतला तर त्यात कर्नाटकातील वातावरण एकाएकी बदलून जाईल याची कोणतीही झलक दिसली नव्हती. उलट त्यांनी 1947 आणि 1962 च्या युद्धांचे संदर्भ देत कॉंग्रेसवर केलेली टीका तशी गैरलागू म्हणूनच गणली गेली.

50-60 वर्षांपुर्वी नेहरूंनी काय केले, इंदिरा गांधींनी काय केले याच्याशी आज लोकांना किती देणेघेणे असणार? त्यामुळे मोदींच्या या शैलीतील प्रचाराचा किती उपयोग होईल याची साशंकता होती. पण मोदींची ही गोळी बरोबर लागू पडली, हाही एक चमत्कारच म्हणावा लागेल. आज चार वर्षे भाजपची केंद्रात सत्ता आहे या कालावधीत मोदींनी देशासाठी काय केले हे सांगून मते मागण्याऐवजी कॉंगेसचे जुने संदर्भ देऊन लोकांना कॉंग्रेस राज्य करण्यास कशी अपात्र आहे हे त्यांनी लोकांना ऐकवले. आता हे योग्य होते की अयोग्य यावर वाद होऊ शकतो पण आज निकाल मात्र त्यांच्या बाजूनेच गेला असल्याने त्यांची ही भाषण शैलीच रास्त ठरली हे मान्य करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

वास्तविक निवडणूक जिंकण्यासाठी जे घटक आवश्‍यक असतात ते सारेच घटक कॉंग्रेसला अनुकूल असताना जादूची कांडी फिरवावी तशी कर्नाटकची इलेक्‍शन मोदींनी फिरवली. त्यापूर्वी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पुरेसे ग्राऊंडवर्क करून ठेवले होतेच. त्याचाही त्यांना फायदा झाला. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राजकीय विश्‍लेषक कितीही जातनिहाय विश्‍लेषण करत असले तरी प्रत्यक्ष मतदार मात्र जातीच्या आधारावर कधीच मतदान करीत नाही हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. तिथे लिंगायत समाजाला अल्पसंख्य दर्जा देण्याचा विषय कळीचा ठरला होता. त्यांची ही मागणी मान्य करून कॉंग्रेसने तिथेही बाजी मारली. त्यामुळे 17 टक्‍के लोकसंख्या असलेला लिंगायत समाज कॉंग्रेसच्या बाजूने उभा राहील असे वातावरण होते तेही फोल ठरले कारण लिंगायतांच्या प्रभावाखालील मतदारसंघातच भाजपला जादा यश मिळाले आहे.

कर्नाटकात 19 टक्‍के मुस्लीम, 18 टक्‍के एससी, एसटी,17 टक्‍के लिंगायत आणि 12 टक्‍के वोक्कलिंग समाजाची मते आहेत. ही जातनिहाय आकडेवारीही कॉंग्रेससाठीच अनुकुल असताना प्रत्यक्षात भाजप तेथे वरचढ ठरली याचाच अर्थ आता जातनिहाय गणिते मांडून निवडणुकांचे भाकित करण्याचा जमाना गेला आहे. ही निवडणूक येडियुरप्पा विरुद्ध सिद्धरामय्या अशी झाली असती तर त्यात सिद्धरामय्यांचा पक्ष निश्‍चित वरचढ ठरला असता. पण कॉंग्रेसचा हा प्रयत्न भाजपने पद्धतशीरपणे हाणून पाडला. त्यांनी या निवडणुकीला राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असे स्वरूप दिले तिथे भाजप उजवी ठरली. या निवडणुकीतील कॉंग्रेसच्या पराभवामुळे राहुल गांधींच्या क्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह लागले गेले आहे.

यापुढील काळात त्याला ते कसे तोंड देणार हे पहावे लागेल. पराभवाने राहुल गांधींची पाठ अजून सोडलेली नाही. त्यांना सन 2019 निवडणुकीत मोदींच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्यासाठी त्यांना कर्नाटकची निवडणूक जिंकणे क्रमप्राप्त होते. त्या अर्थाने त्यांना मिळालेली ही शेवटची संधी होती. त्या आधारावर पुढची राजकीय गणिते राहुल गांधींना सोपी गेली असती. पण त्यांच्या हातून ही संधीही निसटली आहे. या धक्कादायक पराभवाने कॉंग्रेस नेतृत्व आणि पक्ष कार्यकर्त्यांचे जे मानसिक खच्चीकरण झाले आहे त्यातून त्यांना उभारी घ्यायला खूप वेळ लागेल. सततच्या पराभवाने राहुल गांधींचा पक्ष संघटनेवरील धाकही कमी होऊ शकतो. किंबहुना त्यांच्या विरोधात पक्षातच बंडासारखी स्थिती निर्माण होण्याचा धोकाही उद्‌भवू शकतो त्यामुळे यापुढील काळ राहुल गांधींसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)