“आश्वासित’मुळे 508 कर्मचारी “प्रगत’!

वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ : आयुक्‍त हर्डीकर यांचे आदेश

पिंपरी – महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपासून सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगत योजनेचा प्रस्ताव रखडला होता. मात्र, आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना 12 आणि 24 वर्षे नियमित सेवा पुर्ण केलेल्यांना आश्वासित प्रगत योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या लाभासाठी 508 अधिकारी व कर्मचारी पात्र ठरले असून, 95 हे अपात्र झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मागील तीन वर्षांपासून 12 आणि 24 वर्षे सेवेच्या लाभांपासून वंचित ठेवले होते. पालिका प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत होता. त्या कर्मचाऱ्यांना 12 आणि 24 वर्षे सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्मचारी महासंघाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोनदा पदोन्नती देण्यात येते. त्यानूसार महापालिकेत ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 आणि 24 वर्षे झालेली आहे. त्यांना वरिष्ठ पदोन्नती देण्याकरिता पदे मंजूर नाहीत. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदे न देता, केवळ वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. याबाबत पालिका कर्मचारी महासंघ पाठपुरावा करीत होता.

महापालिकेतील आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 12/24 वर्षे सेवेचा लाभ देण्यासाठी 4 जुलैला आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या वर्ग 3 व 4 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यामध्ये 603 अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणी देण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

दरम्यान, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगत योजनेचा पहिला व दुसरा लाभ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालिका सेवेतील गट क आणि ड मधील शासन निर्णयातील अर्टी व शर्तीच्या आधारे आश्वासित प्रगत योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये या योजनेचा कर्मचाऱ्यांना पहिल्या लाभाच्या अनुषंगाने रुपये 100 व दुसऱ्या लाभाच्या अनुषंगाने रुपये 100 अशी एकूण 200 रुपये इतकी वाढ त्यांच्या ग्रेड वेतनामध्ये केली जाणार आहे. तसेच, 12 वर्षांच्या पहिल्या लाभाकरिता वर्ग क आणि ड मधील 227 अधिकारी व कर्मचारी पात्र तर 34 जण अपात्र ठरले आहेत. 24 वर्षांच्या दुसऱ्या लाभाकरिता वर्ग क आणि ड मधील 281 अधिकारी व कर्मचारी पात्र तर 61 जण अपात्र ठरले आहेत. सुधारीत आश्वासित प्रगत योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरी व निलंबन कालावधी सेवा कालावधीतून वगळण्यात येवून तो कालावधी वाढवून लाभ देण्याचा निर्णय प्रशासन विभागाने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)