आश्रमशाळा होणार “तंबाखूमुक्त’

उपक्रम राबविण्याचे राज्य शासनाचे आदेश

पुणे – राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियानांतर्गत राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत. या अभियानास शासनाकडून मान्यताही देण्यात आली असून त्याबाबतचे आदेशही जारी केले आहेत.

राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 502 शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांमध्ये अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हाव्यात व मुलांना तंबाखूमुक्त वातावरण मिळावे, यासाठी 30 जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था हा कार्यक्रम “सलाम मुंबई फाउंडेशन’ या संस्थेने राबविला आहे. ही संस्था गेल्या पाच वर्षांपासून व्यसनमुक्तीचे कार्य करीत असून त्यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारही मिळाला आहे. आश्रमशाळांमध्ये अभियान राबविण्याबाबत सहकार्य करण्याचा प्रस्ताव संस्थेने शासनाकडे सादर केला होता. त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम राबविण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उपसचिव सं. गि. पाटील यांनी जिल्हाधिकारी, समाजकल्याण आयुक्त, अपंगकल्याण आयुक्त, मुख्याध्यापक यांना आदेशही बजाविले आहेत.

मुख्याध्यापकांनी शाळेत तंबाखू सेवनास बंदी असल्याची नोटीस काढावी व विद्यार्थी, कर्मचारी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना नोटीस वाचून दाखवावी, नोटीसची प्रत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावावी, शाळेय नियंत्रण समितीची स्थापना करावी व समितीच्या मासिक आढावा बैठका घेऊन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या सर्व सहायक आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त यांनी आश्रमशाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबविण्याबाबतच्या सूचना द्याव्यात, असेही शासनाने आदेशात नमूद केले आहे.

मुख्याध्यापकांना विविध सूचना
शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या विक्रीवर पूर्णत: बंदी असल्याचे फलक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाना, इंडियन डेन्टिस्ट असोसिएशनचे सदस्य यापैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास शाळेत बोलावून तंबाखूचे दुष्परिणाम, कॅन्सरची लक्षणे या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे व तपासणी शिबीरे घ्यावीत. तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती व्हावी यासाठी पोस्टर्स, घोषणापट्ट्या, नियम शाळेच्या परिसरात व वर्गावर्गात लावावेत. तंबाखूमुक्त शाळा या विषयावर विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र, पथनाट्य, समूहगान, निंबध स्पर्धा आयोजित कराव्यात. तंबाखू नियंत्रणासाठी उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांना प्रमाणपत्र, ग्रिटींगकार्ड, पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करावा आदी विविध सूचनांची अंमलबजावणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी करावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)