आश्रमशाळांमधील रिक्‍त पदे भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबविणार

आश्रमशाळांतील रिक्‍त पदांसाठी विशेष भरती


राज्य शासनाची मंजुरी; परीक्षा पद्धतीने निवड

पुणे – राज्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या 502 शासकीय आश्रमशाळा व 491 वसतिगृहे कार्यरत आहेत. आश्रमशाळांपैकी पहिली ते सातवी पर्यंतच्या 84, पहिली ते दहावी पर्यंतच्या 297 आणि पहिली ते बारावी पर्यंतच्या 121 आश्रमशाळा असून या शाळांमध्ये सुमारे 2 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळा दुर्गम व डोंगराळ भागात असून त्या निवासी असल्याने शिक्षकांना शाळा परिसरात निवासी राहवे लागते. भरतीद्वारे नियुक्‍त झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अन्य ठिकाणी नियुक्‍त झाल्यानंतर सेवा सोडून जातात. काही कर्मचारी दळणवळणाच्या सोयी असणाऱ्या आश्रमशाळांवर बदली करून घेतात. अनुसूचित जमातीमध्ये पात्रताधारक उमेदवार न मिळाल्यामुळे काही पदे रिक्‍त राहतात.

-Ads-

राज्यपालांनी जून 2014 मध्ये अधिसूचना प्रसिद्ध करून विविध विभागातील सुमारे 17 संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अधीक्षक, अधिक्षिका, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक, वसतिगृहातील गृहपाल आदी संवर्गातील पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाचे अवर सचिव गोविंद माईणकर यांनी आदेश जारी केले आहेत.

या भरतीसाठी अटी व शर्तीही निश्‍चित करण्यात आलेल्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध टप्प्यात 100 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार 50 गुण देण्यात येणार आहेत. स्थानिक आदिवासी संस्कृती, स्थानिक प्रमुख बोलीभाषेचे ज्ञान, कल व बुद्धिमत्ता चाचणी आणि आदिवासी प्रती संवेदनशीलता यावर आधारित 35 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त वर्षे आश्रमशाळेत सेवा करणाऱ्यांना 15 गुण देण्यात येणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 3 वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे. वसतिगृह गृहपाल पदासाठी 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

रिक्‍त पदे भरण्याची जाहिरात देऊन त्रयस्थ संस्थेमार्फत अर्ज मागविण्यात येणार आहे. जाहिरात आदिवासी विकास विभाग, सेवायोजन कार्यालये, महाऑनलाईन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे, अर्जांची छाननी करणे, पात्र उमेदवारांची यादी करणे, परीक्षेसाठी प्रवेशपत्र पाठविणे, परीक्षा घेणे आणि निवड यादी तयार करणे आदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)