आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा आजपासून थरार

 सलामीच्या लढतीत बांगला देशसमोर श्रीलंकेचे आव्हान 
दुबई- आशिया खंडातील महत्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषकाला उद्यापासून (शनिवार) सुरुवात होणार असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या प्रमुख संघांमध्येच खरी स्पर्धा रंगणार आहे. या चार संघांव्यतिरिक्‍त या स्पर्धेत अफगाणिस्तान व हॉंगकॉंग या संघांचा समावेश करण्यात आला आहे. यातील हॉंगकॉंगच्या संघाला अद्याप एकदिवसीय संघाचा दर्जा मिळालेला नसून केवळ या मालिकेपुरता त्याला हा दर्जा देण्यात आलेला आहे.

ही चौदावी आशिया चषक स्पर्धा असून आतापर्यंत भारताने सहा वेळा आशिया चषकावर नाव कोरले आहे. तर श्रीलंकेने पाच वेळा आणि पाकिस्तानने दोन वेळा आशिया चषक पटकावला आहे. 2016 मध्ये टी-20च्या पद्धतीने आशिया चषक खेळवला होता. पण यावेळी पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्याच्या पद्धतीने आशिया चषक खेळवला जात आहे. सध्या आशिया चषकाचे विजेतेपद भारताकडे आहे. आशिया चषकातील सर्वात यशस्वी फलंदाज सनथ जयसूर्या असून त्याने 1220 धावा केल्या आहेत. तसेच मुथय्या मुरलीधरन हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने 30 बळी घेतले आहेत.

आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानसह एक क्‍वालिफायर संघ म्हणजे हॉंगकॉंगचा अ गटात समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. 14 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. प्रत्येक गटातील दोन आघाडीचे संघ सुपर 4 फेरीत प्रवेश करतील. या फेरीत सर्व चार संघ एकमेकांशी भिडतील. यातील अव्वल ठरणारे दोन संघ अंतिम लढतीत खेळतील. स्पर्धेतील सर्व सामने दुबई अथवा अबूधाबीमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहेत.

भारत-पाकिस्तान एकाच गटात 
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा एकाच गटात समावेश असून या महिन्यात पाकिस्तान आणि भारत या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची एकूण तीन वेळा गाठ पडण्याची शक्‍यता आहे. संयुक्‍त अरब अमिरात येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाक यांच्यातील पहिला हाय व्होल्टेज सामना 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारत आणि पाक यांच्यात 19 रोजीच्या सामन्यानंतर या दोन संघांची 23 सप्टेंबर रोजी पुन्हा गाठ पडण्याची शक्‍यता आहे. जर खळबळजनक निकालाची नोंद झाली नाही तर या गटात भारत व पाक अव्वल ठरू शकतात. असे जर झाले तर हे दोन्ही संघ 23 सप्टेंबर रोजी एकमेकांविरुद्ध भिडतील. या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केल्यास त्यांच्यात आणखी एक सामना होण्याची शक्‍यता आहे.

आशिया चषक स्पर्धेची गटवारी- अ गट– 1) भारत, 2)पाकिस्तान  3) हॉंगकॉंग     ब गट– 1) श्रीलंका, 2) बांगलादेश  3) अफगाणिस्तान.

आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक 
गट सामने 
15 सप्टेंबर बांगलादेश वि. श्रीलंका
16 सप्टेंबर पाकिस्तान वि. हॉंगकॉंग
17 सप्टेंबर श्रीलंका वि. अफगाणिस्तान
18 सप्टेंबर भारत वि. हॉंगकॉंग
19 सप्टेंबर भारत वि. पाकिस्तान
सुपर फोर 
21 सप्टेंबर- “अ’ गट विजेता वि. “ब’ गट उपविजेता
23 सप्टेंबर- “ब’ गट उपविजेता वि. “अ’ गट उपविजेता
23 सप्टेंबर- “अ’ गट विजेता वि. “अ’ गट उपविजेता
23 सप्टेंबर- “ब’ गट विजेता वि. “ब’ गट उपविजेता
25 सप्टेंबर- “अ’ गट विजेता वि. “ब’ गट विजेता
26 सप्टेंबर- “अ’ गट उपविजेता वि. “ब’ गट उपविजेता
28 सप्टेंबर- अंतिम सामना 

आशिया चषकाचे आतापर्यंतचे विजेते 
1984 (शारजा) विजेता- भारत, 1986 (श्रीलंका) विजेता- श्रीलंका, 1988 (बांगलादेश) विजेता- भारत, 1990-91 (भारत) विजेता- भारत, 1995 (यूएई) विजेता- भारत, 1997 (श्रीलंका) विजेता- श्रीलंका, 2000 (बांगलादेश) विजेता- पाकिस्तान, 2004 (श्रीलंका) विजेता- श्रीलंका,
2008 (पाकिस्तान) विजेता- श्रीलंका, 2010 (श्रीलंका) विजेता- भारत, 2012 (बांगलादेश) विजेता- पाकिस्तान, 2014 (बांगलादेश) विजेता- श्रीलंका, 2016 (बांगलादेश) विजेता- भारत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)