आशियाई स्पर्धेसाठी आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ – गोपीचंद 

सिंधू व श्रीकांतकडून सुवर्णपदकाची अपेक्षा 

जकार्ता: जागतिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू, अनुभवी सायना नेहवाल, तसेच जायंट किलर किदंबी श्रीकांत व एच. एस. प्रणॉय या अव्वल खेळाडूंकडून आशियाई स्पर्धेतील बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताला पदकांची अपेक्षा असून भारतीय प्रशिक्षक गोपीचंद यांच्या मते भारताचा हा आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ आहे.

बॅडमिंटनसाठी स्पर्धेचा ड्रॉ नुकताच जाहीर करण्यात आला असून भारतीय महिलांना या स्पर्धेत खडतर आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मात्र पुरुष खेळाडूंसमोर त्या तुलनेत सोपे आव्हान आहे. गेल्या इंचेऑन स्पर्धेत महिला संघाने कांस्यपदक जिंकून भारताचा 28 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला होता. तत्पूर्वी प्रकाश पडुकोण व विमलकुमार यांनी भारताला 1986मध्ये कांस्यपदक मिळवून दिले होते.

आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनचा समावेश झाल्यापासून भारताची आत्तापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे. भारताने 14 स्पर्धांमध्ये मिळून केवळ 8 कांस्यपदके जिंकली असून त्यापैकी पाच पदके आपण 1982 च्या दिल्लीच्या एकाच स्पर्धेत मिळवली. त्या वर्षी सय्यद मोदीने जिंकलेल्या कांस्यपदकानंतर भारताला एकही वैयक्‍तिक पदक जिंकता आलेले नाही.

सिंधूला गेल्या वर्षीपासून अनेक अंतिम सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे त्यामुळे यंदा तरी तिला निर्णायक घाव घालायला जमेल अशी आशा आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या रॅलीज गुण जिंकून संपवायला सिंधू थोडी कमी पडते आहे असे दिसून येते. अर्थात तिचे मार्गदर्शक आणि ती स्वतः ह्या गोष्टींवर उपाय शोधून काढत असतीलच. सिंधू बऱ्याचदा भोज्याला हात लावून आली आहे त्यामुळे तिच्या क्षमतेविषयी कुणाला शंका असण्याचे कारण नाही. तसेच श्रीकांत हा आपला एक प्रचंड गुणवान खेळाडू आहे. काही महिन्यांपूर्वी तो “वर्ल्ड नंबर वन’ पदाला स्पर्शही करून आलेला आहे. मात्र सातत्यात श्रीकांत जरा कमी पडतो. गेल्या महिन्यातल्या जागतिक स्पर्धेत त्याला खूप सोपा ड्रॉ आलेला होता, मात्र तो पदक मिळवण्यात कमी पडला.

 

भारतीय महिला संघाला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आल्यामुळे त्यांच्यासमोर थेट उपान्त्यपूर्व सामन्यात जपानचे तगडे आव्हान आहे. आकाने यामागुची, नोझुमी ओकुहारा यासारख्या मातब्बर खेळाडू भारतीय खेळाडूंसमोर उभ्या ठाकणार आहे. तर भारतीय पुरुषांसमोर पहिल्या फेरीत मालदीवचे सोपे आव्हान अशले, तरी उपान्त्यपूर्व फेरीत भारतीय पुरुषांना यजमान इंडोनेशियाचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे.

गेल्या दशकात आपल्या बॅडमिंटनची वेगात प्रगती झाली आहे. भारताची बॅडमिंटनची सध्याची फळी गेल्या कित्येक वर्षातली सर्वोत्तम आहे. प्रशिक्षक गोपीचंद ह्यांनी स्पर्धेला निघण्यापूर्वी सांगितलं आहे की आम्हाला प्रत्येक गटात पदकाची संधी आहे.

गेल्या काही महिन्यातली ही तिसरी मोठी स्पर्धा आहे. आधी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपण बॅडमिंटनमध्ये यश मिळवले. त्यानंतर झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला केवळ सिंधूच्या रूपाने एक रौप्यपदक मिळाले. मात्र कदाचित त्यामुळेच आपले इतर खेळाडू यावेळी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतील. सायना नेहवाल दुखापतींमधून आता सावरली आहे, पण वाढते वय तिच्याविरुद्ध जाणारे आहे. तरी सांघिक स्पर्धेत सायनाच्या अनुभवाचा आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो.

साई प्रणिथ, समीर वर्मा हे खेळाडूही सांघिक स्पर्धेत महत्वाची भूमिका बजावू शकतात. दुहेरीत सात्विक साईराज रॅंकिरेड्डी हा 18 वर्षांचा युवा खेळाडू जोमाने प्रगती करतो आहे. त्याची चिराग शेट्टी आणि अश्विनी पोनप्पाबरोबरची जोडी चांगली जमली आहे. मनू अत्री, सुमित रेड्डी, प्रणव चोप्रा, सिक्‍की रेड्डी असे अन्य गुणवान खेळाडूही अनपेक्षित कामगिरी करू शकतात.

भारतीय बॅडमिंटन संघ- 
पुरुष संघ- किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साई प्रणिथ, समीर वर्मा, सौरभ वर्मा, सत्विकसाईराज रॅंकीरेड्डी, चिराग शेट्टी, मनू अत्री, बी. सुमित रेड्डी व प्रणव जेरी चोप्रा,
महिला संघ- पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, अश्विनी पोनाप्पा, एन. सिक्‍की रेड्डी, अस्मिता चालिहा, साई उत्तेजिता राव, आकर्षी कश्‍यप, ऋतुपर्णा पांडा, गायत्री गोपीचंद व आरती सारा सुनील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)