नवी दिल्ली: भारतीय संघासाठी आशियाई स्पर्धा अत्यंत महत्त्वार्ची असून या स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी आगामी विश्‍वचषक स्पर्धेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. तसेच आशियाई स्पर्धेतून आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याचेही भारतीय संघाचे लक्ष्य आहे, असे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.
हरेंद्र सिंग म्हणाले की, आम्ही हॉकीमध्ये पुन्हा पुनरागमन केले असल्याचे भारतीय संघाने आपल्या कामगिरीतून सर्व जगाला पुन्हा दाखवून दिले आहे. सध्या आम्ही जरी पाचव्या क्रमांकावर असलो तरी आगामी काळात पहिल्या तीन संघांमध्ये आम्ही निश्‍चितच स्थान मिळवू याचा आम्हाला विश्‍वास असून आशियाई स्पर्धेच्या माध्यमातून हे आमचे प्रमुख लक्ष्य असणार आहे. तसेच या स्पर्धेतील आमची कामगिरी आम्हाला वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
आम्हाला आत्मविश्वास आहे, मात्र अतिआत्मविश्वास नाही, असे सांगून हरेंद्र सिंग म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखू शकत नाही. खरे तर स्पर्धेच्या अशा पातळीवर कुठलाही संघ प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखणार नाही. आम्ही चांगले प्रदर्शन करत आहोत, सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत आणि आम्ही आता उत्सुकतेने पहिल्या सामन्याची वाट पाहत आहोत. आशियाई स्पर्धांकडे आम्ही आगामी ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने सरावासाठी महत्त्वपूर्ण स्पर्धा म्हणून पाहतो आहेत.
हरेंद्र सिंग हे चौथ्यांदा भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली असून त्यांच्या मते भारतीय संघाने आपली ही वाटचाल अशाच प्रकारे सुरू ठेवली, तर आशियाई स्पर्धेसह आगामी विश्‍वचषक व ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्याचे लक्ष्य भारताला ठेवता येणार आहे.
इतर संघांबद्दल काही विचार करू नका, लक्ष केंद्रित करा आणि फिट रहा असा सोपा सल्ला मी खेळाडूंना दिला आहे. आम्ही प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला गंभीरपणे घेतो, कारण त्यामुळे एक योजना तयार होते, आम्ही प्रत्येक सामन्यासाठी परिस्थितीनुसार नियोजन करतो. या स्पर्धेत आम्ही सर्वोच्च स्थानावर आहोत आणि त्यामुळे इतर संघांपेक्षा आम्हाला मानसिक फायदासुद्धा होतो.
परंतु सामन्याच्या दिवशी संघ कशा प्रकारे खेळतो यावर सर्व काही अवलंबून असते, असे सांगून हरेंद्र सिंग म्हणाले की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमचे पेनल्टी कॉर्नरच्या वेळी प्रदर्शन फार चांगले नव्हते. आम्हाला त्यामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे आणि आम्ही त्यावर काम करीत आहोत. आम्हाला जास्तीत जास्त गोल करायचे आहेत. तसेच लवकर आघाडी घेऊन ती राखून ठेवायची आहे, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)