आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 : भारताचा कोरियावर दणदणीत विजय

मस्कत: हरमनप्रीतसिंगच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर 4-1ने मात केली. या स्पर्धेत भारताने अपराजित राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने या चषकात पाच सामन्यापैकी 4 सामन्यात विजय मिळवला असून एका सामना बरोबरीत सुटला होता.

जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर दक्षिण कोरिया संघ चौदाव्या स्थानावर आहे. लढतीच्या पाचव्याच मिनिटाला हरमनप्रीतसिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. याच्या पाच मिनिटानंतर गुरजंतसिंगने गोल करून भारताची आघाडी वाढवली. लढतीच्या 20व्या मिनिटाला कोरियाकडून कर्णधार लीने गोल करून पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मध्यंतराला भारताकडे 2-1 अशी आघाडी होती. उत्तरार्धातील 47व्या मिनिटाला हरमनप्रीतसिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताची आघाडी वाढवली. लढत संपायला एक मिनिट शिल्लक असताना मिळालेला पेनल्टी कॉर्नर हरमनप्रीतने सत्करणी लावला आणि भारताला 4-1 असा विजय मिळवून दिला. भारताचा गोलकीपरने चांगला बचाव करून कोरियाला रोखले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विजयासह भारताने गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. भारताच्या खात्यात 13 गूण जमा आहेत. या चषकात भारताने पहिल्या सामन्यात ओमानचा 11- 0 ने धुव्वा उडवला होता. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर 3- 1 ने मात केली होती. तिसऱ्या सामन्यात जपानवर 9- 0 ने दणदणीत विजय मिळवला होता. तर मलेशियाविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)