आशियाई क्रीडास्पर्धेचा आजपासून थरार !

इंडोनेशियासमोर दहशतवाद, पर्यावरण आणि आर्थिक समस्यांचे आव्हान 
जकार्ता: ऑलिम्पिकनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या भव्य आणि जागतिक दर्जाच्या आशियाई क्रीडास्पर्धेसाठी जगभरातील ऍथलीट येथे दाखल होत असताना स्पर्धेच्या यशस्वी संयोजनाचे आव्हान पेलण्यासाठी इंडोनेशियाचे प्रशासन सज्ज झाले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि रंगारंग उद्‌घाटन सोहळ्याने आज (शनिवार) आशियाई क्रीडास्पर्धांना प्रारंभ होणार आहे. राजकीय स्तरावर परस्परांचे कट्टर शत्रू असलेल्या दक्षिण आणि उत्तर कोरियाचे ऍथलीट एकमेकांच्या साथीत खेळाडूंच्या संचलनात सहभागी होणार असून उद्‌घाटन सोहळ्याचे ते एक आगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या बास्केटबॉल प्रकारांत, तसेच कॅनोइंग व रोइंग या क्रीडाप्रकारांमध्ये दक्षिण आणि उत्तर कोरियाचे संयुक्‍त संघ सहभागी होणार आहेत.
मात्र या स्पर्धेसाठी शेकडो ऍथलीट इंडोनेशियात येऊन दाखल झाले असताना त्यांच्यासाठी सुविधांची तयारी पुरेशी नसल्याचेच दिसून येत आहे. इंडोनेशियाने या दर्जाच्या क्रीडास्पर्धा यापूर्वी कधीच आयोजित केलेल्या नाहीत. परिणामी त्यांना या बाबतीत कसलाही अनुभव नाही. त्यामुळेच इतक्‍या महत्त्वाच्या स्पर्धा इंडोनेशियाला बहाल करण्यात आल्यानंतर विविध क्षेत्रांमधून टीका झाली होती. तरीही इंडोनेशियाने फारच आग्रह धरल्यानंतर त्यांना संधी देण्यात आली.
आता मात्र एका बाजूला दहशतवाद, दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आव्हान आणि तिसऱ्या बाजूला इतक्‍या भव्य स्पर्धाच्या आयोजनासाठी लागणारा पाण्यासारखा पैसा उभा करण्याचे आव्हान अशा विविध समस्यांचा सामना करणाऱ्या इंडोनेशियाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद देतानाच त्यात राहिलेल्या त्रुटींचीही चर्चा होणे आवश्‍यक ठरणार आहे.
जकार्ता आणि पालेमबॅंग या शहरांवर सुमारे 16 हजार ऍथलीट आणि पदाधिकारी यांचा जणूकाही पाऊसच पडणार आहे. या सर्वांची उत्तम व्यवस्था करण्याबरोबरच सर्व क्रीडास्पर्धा बिनचूक पार पाडण्याचे आव्हान इंडोनेशिया कसे पेलणार हे येत्या काही दिवसांत दिसून येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 45 देशांची लोकसंख्या जगाच्या दोन तृतीयांश असून या देशांमधील ऍथलीटच्या दृष्टीने आशियाई क्रीडास्पर्धांना भलतेच महत्त्व आहे. ऑलिम्पिकमध्ये हुलकावणी दिलेल्या पदकाची कमाई या स्पर्धेत करून आपल्या कारकिर्दीला चार चॉंद लावण्याचे लक्ष्य असंख्य खेळाडू बाळगतात.
चीनचे वर्चस्व, भारतासमोर कडवे आव्हान 
ऑलिम्पिक स्पर्धेतही आपला ठसा उमटविणाऱ्या बलाढ्य चीनचे खेळाडू यंदाही वर्चस्व गाजवितील, असा सर्वांचा अंदाज आहे. त्याखालोखाल जपान आणि दक्षिण कोरिया या देशांकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. चीनने 2014 आशियाई स्पर्धेत 151 सुवर्णांसह 345 पदकांची कमाई केली होती. दक्षिण कोरियाने 79 सुवर्णांसह 228 पदके, तर जपानने 47 सुवर्णांसह 200 पदके पटकावून दुसरे व तिसरे स्थान निश्‍चित केले होते. 11 सुवर्णांसह 57 पदके जिंकणाऱ्या भारताला या स्पर्धेत आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. इंचेऑन येथे झालेल्या 2014 आशियाई क्रीडास्पर्धेत भारताचे 541 खेळाडू 28 क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी झाले होते. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत 11 सुवर्ण, 9 रौप्य आणि 37 कांस्य अशी एकूण 57 पदके पटकावली होती. भारतीय पुरुष हॉकी संघाने तर तब्बल 16 वर्षांनंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदा भारतीय पथकामध्ये विक्रमी 800 पेक्षा अधिक खेळाडूंचा समावेश असून त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. षोडशवर्षीय मनू भाकर व हिमा दासपासून अव्वल कुस्तीगीर सुशीलकुमार ते जागतिक विक्रमवीर नीरज चोप्रा असे अनेक भारतीय ऍथलीट पदकांसाठी दावेदार आहेत.
संयोजकांसमोर अनेक समस्या 
केवळ तीनच महिन्यांपूर्वी इंडोनेशियावर गेल्या 10 वर्षांतील सर्वात भयानक दहशतवादी हल्ला झाला होता. इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सुराबाया या शहरात आत्मघाती बॉम्बर्सने केलेल्या हल्ल्यात 13 नागरिक मृत्युमुखी पडले होते. आशियाई क्रीडास्पर्धेवरही दहशतवादी हल्ल्यांचे सावट असून त्यामुळे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था आणि कडेकोट बंदोबस्त या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ जगभरातील खेळाडूंवर येणार आहे. दुसरीकडे इंडोनशियातील अतिभव्य जंगलांना लागणारे वणवे ही त्यांच्यासमोरील पर्यावरणाची गंभीर समस्या आहे. जकार्तामधील ट्रॅफिक जॅमचा सामना करण्यासाठी सम-विषम तारकांच्या नंबरप्लेट असलेल्या वहानांनाच त्या त्या दिवशी रस्त्यावर येण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच स्पर्धेच्या काळात शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)