आशियाई क्रीडास्पर्धा : बॅडमिंटनमधील भारताचे आव्हान संपुष्टात

सायनाचा पराभव निर्णायक

जकार्ता: भारतीय महिला बॅडमिंटनचे संघाला आशियाई क्रीडास्पर्धेत पदक निश्‍चित करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्‍यकता होती, परंतु त्यांना तोही मिळवण्यात अपयश आले. तर दुसरीकडे भारताच्या पुरुष संघाला देखील इंडोनेशियाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचेही आव्हान संपुष्टात आले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणय यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र इतर खेळाडूंकडून त्यांना हवी तशी साथ न मिळाल्याने भारताचे दोन्ही गटातील आव्हान संपुष्टात आले. बॅडमिंटन महिला सांघिक प्रकारातील पहिल्या एकेरी सामन्यात पी. व्ही. सिंधूने जपानच्या आकाने यामागुचीवर 21-18, 21-19 अशी मात करताना भारताला आघाडीवर नेले. मात्र दुसऱ्या लढतीत अग्रमानांकित नोझुमी ओकुहाराने भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालचा 21-11, 23-25, 21-16 असा पराभव करताना जपानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.

सामन्याच्या पहिल्या गेममध्ये यामागुचीने आपल्या ताकदवान फटक्‍यांचा वापर करत सिंधूला मागे टाकले. पहिल्या गेमच्या मध्यंतरानंतरही यामागुचीकडे 3 गुणांची आघाडी होती. मात्र सेटच्या उत्तरार्धात सिंधूने जोरदार पुनरागमन केले. सिंधूने स्मॅशचा वापर करत पहिली गेम 21-18 च्या फरकाने खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्येही अपेक्षेप्रमाणे दोघींमध्ये अटीतटीचा सामना रंगला. दोन्ही खेळाडू एकमेकींना पुढे जाण्याची संधी देत नव्हत्या. दरम्यान सिंधूने काही आक्रमक फटके खेळत यामागुचीला मात देण्याचा प्रयत्न केला. याला यामागुचीनेही ड्रॉपचे सुंदर फटके खेळत जोरदार प्रत्युत्तर दिले. मध्यंतरापर्यंत यामागुचीने सामन्यात एका गुणाची नाममात्र आघाडी घेतली.

मध्यांतरानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करत बरोबरी साधली. अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना 19-19 असा बरोबरीत होता. मात्र मोक्‍याच्या क्षणी सिंधूने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत यामागुचीला चूक करायला भाग पाडत गेम 21-19 ने खिशात घातली. यानंतर दुसऱ्या सामन्यात सायनाविरुद्ध जपानच्या नोझुमी ओकुहाराने 21-11 च्या फरकाने पहिली गेम जिंकली. यानंतर दुसऱ्या सेटमध्येही ओकुहाराने आपले वर्चस्व कायम राखलं होतं. सायनाने दुसऱ्या सेटच्या उत्तरार्धात धडाकेबाज पुनरागमन करत तब्बल 4 मॅचपॉईंट वाचवले. आपला सर्व अनुभव पणाला लावत सायनाने दुसऱ्या गेममध्ये ओकुहाराची झुंज 25-23 ने मोडून काढली. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी सावध सुरुवात केली. मध्यंतरापर्यंत सायनाने आपला अनुभव पणाला लावत 11-10 अशी नाममात्र एका गुणाची आघाडी घेतली. मात्र अखेरच्या क्षणांमध्ये ओकुहाराने बाजी मारत तिसरा सेट 21-16 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या खिशात घातला. दुहेरीत सारा सुनील आणि एन सिक्‍की रेड्डी यांना पराभव पत्करावा लागल्याने जपानने 2-1 अशी आघाडी घेतली. जपानच्या सायाका हिरोटा आणि युकी फुकुशिमा यांनी 21-15, 21-6 असा सहज विजय मिळवला. आता दुसऱ्या दुहेरीत सिंधू आणि अश्विनी पोनप्पा यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा होती.

मात्र, ऑलिम्पिक पदक विजेत्या मिसाकी मात्सुटोमो व आयाका ताकाहाशी या जोडीने 13-21, 12-21 असा विजय मिळवत भारताचे आव्हान संपुष्टात आणले. पुरुष संघ इंडोनेशियाविरुद्ध पराभूत महिला संघाच्या पराभवानंतर भारताच्या पुरुष संघाकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र, भारतीय संघाने इंडोनेशियाकडून 1-3 असा पराभव स्वीकारल्याने त्यांचेही आव्हान आणि भारताची आशाही संपुष्टात आली. पहिल्याच सामन्यात भारताचा आघाडीचा खेळाडू किदंबी श्रीकांतने पहिल्याच सामन्यात अँथनी सिनिसुका गिंटींगकडून 21-23, 22-20, 10-21 असा पराभव पत्करल्याने भारत 0-1 ने पिछाडीवर पडला. दुसऱ्या सामन्यात सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या राष्ट्रकुलच्या रौप्यपदक विजेत्या जोडीने विश्‍वक्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या केव्हिन संजय मुकालिजो आणि मार्कस फेर्नाल्डी यांच्याकडून 21-19, 19-21, 16-21 असा पराभव स्वीकारल्याने भारत 0-2ने पिछाडीवर पडला. त्यानंतर एच.एस.प्रणयने जोनाथन क्रिस्टीचा 21-15, 19-21, 21-19 असा पराभव करत भारताची पिछाडी 1-2 अशी भरून काढली. मात्र, फजर अल्फियान आणि मोहम्मद रिआन अर्डिनाटो यांनी मनू अत्री आणि बी. सुमीथ यांचा 14-21, 18-21 असा सहज पराभव करत इंडोनेशियाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)