आशावादी गोष्टींचा गुच्छ पुढील दशकाचा हिरा घडवितो आहे! (भाग-२)

आशावादी गोष्टींचा गुच्छ पुढील दशकाचा हिरा घडवितो आहे! (भाग-१)

आजही आपला ६० टक्के बाजार हा स्थूल घटकांशी (Macro Factors) निगडीत आहे. ज्याची कारणं आपण पाहुयात,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यवसाय सुलभता : काही बाबतीत आपल्या देशात पायाभूतरित्या जुनाट बुरसटलेल्या पद्धती पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, मुंबई शहरात एक हॉटेल नव्यानं सुरु करण्यासाठी ४ / ५ डझन परवानग्या व सोपस्कार पार पडावे लागतीलतर अगदी बँकेतून पैसे काढण्यासाठी टोकन घेऊन वाट पहात बसण्याची पद्धत अजूनही काही ठिकाणी कायम आहे. वर्ल्ड बँकेच्या क्रमवारीत उचलून धरलेली भारतातील ईझ ऑफ डुईंग बिझनेस यशस्वी होत असल्यास लघु व मध्यम उद्योगांच्या कंपन्यांचे शेअर्स घेणं देखील हितावह ठरू शकेल.

उत्पादन घटक : इतर देशांच्या तुलनेत हे महाग आहेत. जेथे अमेरिकेत ऋणको दर हे जेमतेम ५ टक्क्यांपर्यंत आहेत ते भारतात ११ % आहेत. तर भारतातील किमान वेतन (मजुरी) हे बांगलादेशाच्या तिप्पट आहे.

पर्जन्यमान : भारतीय अर्थव्यवस्थेत पर्जन्यमान हे खूप मोठी भूमिका निभावतं. नुसतंच देशाचं सरासरी पर्जन्यमान गाठलं म्हणजे उत्तम पाऊस झाला असं धरून चालणार नाही. या वर्षी महाराष्ट्रात खासकरून मराठवाडा/ विदर्भात दुष्काळ जाणवतोय तर यावर्षी पावसामुळं केरळमध्ये मागील ९४ वर्षांतील सर्वात वाईट परिस्थिती होती. त्यामुळं कांही ठिकाणी कोरडा तर काही ठिकाणी ओला दुष्काळ व नुकसान शेतीचंच. त्यामुळं धान्याच्या किमतीत वाढ, कर्जमाफी व त्याचा होणारा अर्थव्यवस्थेवरील परिणाम.

अशा सर्व गोष्टींमुळं काही बलाढ्य कंपन्याच तरल्या जातात ज्या शेवटपर्यंत टिकतात. जेव्हा २०१५ मध्ये चीनमध्ये मंदी आली होती, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या येथील स्टील कंपन्यांवर झाला होता. टाटा स्टील तरली गेली परंतु भूषण स्टील, एस्सार स्टील आदी कंपन्या संकटात सापडल्या.सांगायचा मुद्दा हाच की ज्या कंपन्या अशा स्थूल घटकांबाबतीतच्या चढ-उतारांवर मात करू शकतील, अशा कंपन्यांचे शेअर्स पडत्या बाजारात खरेदी करून संयम ठेवल्यास येणाऱ्या वर्षांमध्ये उत्तम परताव्याची अपेक्षा बाळगता येऊ शकते.

जाता जाता, १३ डिसेंबर रोजी इंडियन ऑईलनं २९.७६ कोटी शेअर्सची ४४३५ कोटी रुपयांची पुनर्खरेदी १४९ रुपये भावात जाहीर केली आणि त्याचबरोबर ६५५६ कोटी रुपयांचं लाभांश वाटप देखील. या कंपनीचा सर्वात मोठा शेअरहोल्डर हे भारत सरकार आहे (५४%) त्यामुळं आपल्या होल्डिंगमधून बायबॅक द्वारे सरकार अंदाजे २४०० कोटी रुपये उभे करू शकेल तर लाभांशाद्वारे सरकारच्या तिजोरीत ३५४४ कोटी रुपये पडतील. यासाठी कंपनीनं २५ डिसेंबर ही रेकॉर्ड डेट जाहीर केलीय.

आता गुंतवणूकदारांसाठी विचार केल्यास जर एखादा गुंतवणूकदार नजीकचा विचार करत असेल तर १३७ रुपयांवर असलेल्या शेअरचा बायबॅक १४९ रुपयांना म्हणजे ८ टक्क्यांचा फायदा व त्यात रु. ६.७५  प्रतिशेअर लाभांश म्हणजेच जवळजवळ ५ टक्क्यांच्या आसपास लाभांशाचं उत्पन्न (Dividend Yield) असे मिळून जवळपास १३% फायदा होतोच आहे.  परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बायबॅकमध्ये आपले शेअर्स न देणं हितावह ठरू शकतं, यामागं कारणं म्हणजे एक तर ही कंपनी वर्षाकाठी भरभक्कम लाभांश देत असते व सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ५५ अमेरिकन डॉलर्सच्या देखील खाली आहेत, ज्या सप्टेंबरमध्ये ८५ डॉलर्सच्या वरती होत्या. त्यामुळं जरी या किंमती ३५ टक्क्यांनी पडलेल्या आहेत तरी आपल्या बाजारातील इंधनाचे दर जेमतेम १६ टक्केच पडलेले आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७४ रुपयांच्या वर गेलेला रुपयाचा दर देखील आता ७० च्या आसपास आहे, म्हणजे या कंपनीचे मार्जिन्स नक्कीच येणाऱ्या दिवसांत सुधारतील, त्यामुळं दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी अशा बायबॅकपासून लांबच राहिलेलं बरं अथवा आता बायबॅकमध्ये शेअर्स देऊन पुन्हा पडत्या बाजारात त्यांची पडत्या भावात खरेदी करणं, ही अशी कला देखील अनेकांना अवगत आहे. जसं मागील महिन्यात नाल्कोच्या शेअर्सच्या बाबतीत झालं, टेंडर डेटच्या सुमारास ७० रुपयांवर असलेला हाच शेअर आता बायबॅक नंतर ६२ रुपयांना मिळतोय.

कच्च्या तेलाचे पडलेले भाव, वधारलेला रुपया, जीएसटीची आकडेवारी, सार्वजनिक बँकांना केला गेलेला पतपुरवठा, इ. गोष्टीं आपल्या बाजारासाठी नक्कीच आशावादी आहे व त्यामुळं येणाऱ्या वर्षात होणाऱ्या निवडणुका व त्यांचा बाजारावर काय परिणाम होईल या ऐवजी तेव्हा असू शकणारा बाजारावरील उच्च दबाव हा पुढील दशकासाठी उत्तम हिरा घडवत नसेल कशावरून ! कारण पवित्र बायबलमध्ये म्हटलंय, ‘आशा निराशा करत नाही’ (रोम. ५:५). नक्कीच, मेरी ख्रिसमस व हॅप्पी न्यू इयर म्हणताना मेरी व हॅप्पी या दोन्ही शब्दांचे अर्थ जरी सारखेच असले तरी त्यांचा वापर वेगवेगळा केलेला दिसतो,  बाकी समझनेवालोंको इशारा काफी हैं l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)