नालासोपारा प्रकरण : एटीएसची सत्र न्यायालयात माहिती


अविनाश पवारच्या कोठडीत 4 सप्टेंबरपर्यत वाढ

मुंबई – राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टमध्ये श्‍याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर आणि रितू राज यांचा देखील समावेश होता, अशी माहिती एटीएसने मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान दिली.

नालासोपारा शस्त्रसाठ्यानंतर एटीएसने हा धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या आठवड्यात 24 ऑगस्ट रोजी एटीएसने अविनाश पवार (30) या तरूणाला घाटकोपरमधून अटक केली होती. अविनाश पवारची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर करण्यात आले.

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केस डायरीचे वाचन केले. केस डायरीतून श्‍याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर आणि रितू राज हे हिंदू कट्टरपंथीयांच्या रडारवर होते, अशी माहिती समोर आली आहे. यातील श्‍याम मानव यांच्यासाठी कट्टर हिंदूत्ववाद्यांनी रेकी केल्याचे यात म्हटले आहे. सुनावणीनंतर पवारच्या कोठडीत 4 सप्टेंबरपर्यत वाढ करण्यात आली.

नालासोपारासह राज्याच्या अन्य भागातून हस्तगत केलेली स्फोटके, शस्त्रसाठ्याशी आणि त्याप्रकरणी अटकेत असलेल्या कट्टरवाद्यांशी पवारचा संबंध पुढे आल्यानंतर पोलिसांनी अविनाश पवारला अटक केली होती.

या प्रकरणात याआधी अटकेत असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर यांच्या चौकशीतून पवारचे नाव पुढे आले. अतिरेकी, घातपाती कारवायांचा कट आखणाऱ्या गटाचा पवार सक्रिय सदस्य होता, छापेमारीत हस्तगत गावठी बॉम्ब त्यानेच तयार केले, असा संशय एटीएसने गेल्या सुनावणीत व्यक्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)