आव्वाज कोणाचा…? फक्त दोन शहर प्रमुखांचा!

सातारा ः आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करताना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे

शिवसेना मंत्र्यांच्या दौर्‍याकडे प्रमुख पदाधिकार्‍यांची पाठ

सातारा, दि.7 (प्रतिनिधी) – आव्वाज कोणाचा ही प्रश्नावजा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या देखील कानावर पडली तर आपसूक उत्तर ..शिवसेनेचा असे उत्तर तोंडातून बाहेर आल्याचे पहायला मिळते. मात्र, रविवारी सातारा दौर्‍यावर आलेले शिवसेनेच्या मंत्राच्या स्वागताला प्रमुख पदाधिकारी वगळता केवळ दोन शहरप्रमुखच उपस्थित राहिल्याने जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती नेमकी काय आहे, याचे उत्तर मंत्र्यांना आपसूकच मिळाले.
आरोग्यमंत्री दीपक सावंत हे रविवारी स्वाईन फ्ल्यूमुळे निर्माण झालेली परिस्थिती व वैद्यकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी सातार्‍यात आले होते. दुपारी साडे बारा वाजता त्यांनी जिल्हा परिषदेत तब्बल तीन तास आढावा बैठक व पत्रकारांशी संवाद साधला. या नंतर त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून स्वाईन फ्ल्यू वार्डची पाहणी केली. या वेळेत केवळ शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे व निमिष शहा व शिवसैनिक उपस्थित होते. एकाबाजूला शिवसेना पक्ष प्रमुख स्वबळावर लढण्याची घोषणा करीत असताना दुसर्‍या बाजूला शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री सातार्‍यात किमान पाच तास थांबलेले असताना केवळ शहरप्रमुखच उपस्थित राहिल्याने चर्चाना उधाण आले होते. जिल्ह्यात शिवसेना मजबूत व्हावी यासाठी एक नव्हे तर तीन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले. मात्र, तीन पैकी एकही जिल्हाप्रमुख मंत्र्यांच्या स्वागताला उपस्थित राहिले नाहीत. त्याच बरोबर तालुकाप्रमुख अन उपजिल्हाप्रमुख देखील अनुपस्थित राहिल्याने मंत्र्यांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. खरे तर राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला मूळात कमी स्थान मिळाले असताना सेनेचे कॅबिनेट मंत्री सातारा दौर्‍यावर येतात याची माहिती शहरप्रमुखांना मिळत असेल तर इतरांना ती मिळाली नाही की मिळून देखील त्यांनी येणे टाळले असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.

-Ads-

हवा फक्त राष्ट्रवादी, भाजपची
सत्तेत असताना जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या स्वागताला हजारोंच्या संख्येने गर्दी व्हायची. आज ही पक्षाध्यक्ष शरद पवार व इतर दिग्गज नेते आले तरी तेवढीच गर्दी होत असते. त्यापाठोपाठ आता भाजपचे राज्यमंत्री जरी सातार्‍यात आले की भाजप पदाधिकारी झाडून उपस्थित राहतात. मात्र, दुसऱयाबाजूला पक्षाध्यक्षांनी स्वबळाचा नारा देवून देखील सेना मंत्र्यांच्या स्वागताला प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित राहत असल्याने येत्या काळातही जिल्ह्यात भाजप अन राष्ट्रवादीची हवा कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे.

पालकमंत्री नव्हे थेट आरोग्यमंत्रीच आले
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या वाढत असताना पालकमंत्री विजय शिवतारे हे सातार्‍यात आढावा बैठक घेवून अधिकार्‍यांना सूचना करतील अशी अपेक्षा होती. मात्र, उलट थेट आरोग्यमंत्रीच पालकमंत्र्यां अगोदर सातार्‍यात दाखल होवून त्यांनी पक्के शिवसैनिक असल्याची झलक दाखवून दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)