आवास योजनेतून सव्वासहा हजार घरे

सदनिका बांधकामाच्या करारास स्थायीत बहुमताच्या जोरावर मंजुरी

पुणे – “प्रधानमंत्री आवास योजने’च्या “सर्वांसाठी घरे -2022′ या प्रकल्पांतर्गत पुणे महापालिकेने हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन ठिकाणी 6 हजार 264 सदनिका बांधण्यास आणि लाभार्थीबरोबर करार करण्याला सोमवारी स्थायी समितीत बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर करून घेतला. या घरांसाठी जीएसटी वगळावे अशी विरोधकांनी दिलेली उपसूचना फेटाळण्यात आली. त्यावर मतदान झाले. सहा विरुद्ध पाच मतांनी मूळ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यात पंतप्रधान आवास योजना 382 शहरांमध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातही ती योजना राबवण्यात येत आहे. शहर सुधारणा समितीच्या बैठकीतही हा विषय मंजुरीसाठी आला होता. त्यावेळीही विरोधकांनी यावर बरीच टीका केली होती. घरांच्या दरावरूनही नाराजी व्यक्त केली होती. तसेच प्रकल्पासाठी भूसंपादन झाले नसताना घाईघाईने प्रस्ताव का आणला, असा प्रश्‍न विरोधकांनी उपस्थित केला होता. याशिवाय जीएसटी लागू करू नये, अशी उपसूचनाही दिली होती. शहर सुधारणा समितीतही ही उपसूचना सत्ताधाऱ्यांनी मतदानाने फेटाळली. स्थायी समितीतही मतदानाने ती फेटाळण्यात आली.

या योजनेंतर्गत हडपसर परिसरात 3170, खराडीत 2013, वडगाव खुर्द मध्ये 1071 अशी 6 हजार 264 सदनिका बांधण्यात येणार आहेत. एकूण जमीनीचे क्षेत्र 99 हजार 224 चौरस मीटर इतके आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 648 कोटी 72 लाख 1,600 रुपये आहे. केंद्र सरकारचे अनुदान 93 कोटी 96 लाख असून, राज्य सरकारचा अनुदानाचा वाटा 62 कोटी 64 लाख रुपये आहे. लाभार्थीकडून 492 कोटी 12 लाख 1,600 रुपये इतकी रक्कम घेण्यात येणार आहे. हडपसरमधील सर्व्हे नंबर 76 सोडून अन्य जमिनी टीडीआरपोटी महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. खराडी आणि वडगाव खुर्द येथील जमिनी अजून ताब्यात आल्या नसल्याचे मुळीक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)