‘आवाज वाढीव…’ कोणाला सांगणार?

“एकीकडे, दहीहंडीचे स्तर पाहिजे तेवढे लावा ” असे म्हणत न्यायालयाने त्याची (स्तर ठरविण्याची) जबाबदारी राज्यसरकारवर टाकली. त्यामुळे तमाम दहीहंडी उत्सवाचे आयोजक खुशीत असताना ‘डीजे’ वाल्या बाबूंनी मात्र ”आवाजाच्या मर्यादेवरून’ दहीहंडी आणि गणेश उत्सवात असहकार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे म्हणे. आता हे म्हणजे, ‘एका हाताने पुढे जा म्हणायचे आणि दुसऱ्या हाताने धरून ठेवायचे असे नाही का झाले?. ‘डीजे’ शिवाय कोणत्या तरी उत्सवाला मजा हाय का राव? एक तर आपल्याकडे सणाला नाही तोटा. शिवाय असे सण वर्षातून फक्त एकदाच येत असतात आणि तेही ‘सुतका’त असल्यासारखे साजरे करायचे काय? त्यामुळे कोणताही सण साजरा करायचा म्हणजे ‘डीजे’ चा दणदणाट पाहिजे का नको राव? त्याशिवाय सण साजरा केल्याचे समाधान तरी कसे मिळणार !.आणि मह्त्वाचे म्हणजे एकदा का या ‘डीजे’ च्या आवाजाची ‘झिंग’ चढली की नाचण्याशिवाय पर्यायच उरत नाही त्यामुळे अनायासे गल्लोगल्ली ‘शामक डावर’ तयार होऊ लागले होते. ही गोष्ट कोणाच्या लक्षातच येत नाही.

या ‘डीजे’ च्या आवाजामुळे म्हणे कोणाची तरी ‘डोकेदुखी’ सुरु झाली आणि त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आणि मग न्यायालयाने देखील त्यांची ‘डोकेदुखी’ दूर करण्यासाठी ‘डीजे’च्या आवाजावर तसेच कालमर्यादेवर बंदी घातली. त्यामुळे या ‘डीजे’ चा आवाज ‘डेसिबल’ मध्ये मोजण्यात येऊ लागला शिवाय रात्री दहा वाजेपर्यंतच ‘डेसिबल’ चा आवाज विशिष्ट पातळीपर्यंतच ठेवण्याचा आदेश देण्यात आला. मात्र हा ‘आदेश’ ऐकतोय कोण? ‘डीजे’ चा आवाज कमी झाला की, नाचणाऱ्यांचे पाय जागीच थबकायला लागले त्यासाठी ”अरे आवाज वाढीव की” असे ‘डीजे’ बाबूंना सांगण्यात येऊ लागले. एकाने तर ‘पोष्टर गर्ल’ च्या मदतीने ”अरे आवाज वाढीव, ‘डीजे’ तुझ्या आईची… ” असे म्हणत ‘आईची शपथ’ घालणारे खास गाणेही तयार केले. आता हे गाणे ‘डीजे’ चा आवाज वाढविल्याशिवाय स्पष्ट कसे ऐकू येणार? शिवाय एका ‘डीजे’ मधून हे गाणे म्हणजे ‘महापाप’च की, त्यामुळे ‘डीजे’च्या भिंतीच्या भिंती उभ्या राहू लागल्या. रस्ता अरूंद असो व गल्लीबोळ कितीही छोटा असला तरी तेथे या ‘डीजे’च्या भिंती उभारण्यात येऊ लागल्या. त्यामुळे आवाजाच्या दणदणाट घुमू लागला. शिवाय वाहतुकीची कोंडी होऊ लागली पण ती तर रोजचीच कटकट आहे असे मानून तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी सण काही पुन्हा पुन्हा येत नाही तो वर्षातून फक्त एकदाच त्यामुळे तो ‘साजरा’ करण्यासाठी न्यायालयाचा आदेश पाळायलाच पाहिजे असे थोडेच आहे. मात्र तरीही कायदा व सुव्यस्थेला मानणाऱ्या पोलिसांनी मनात आणलेच त्यामुळे ‘डीजे’ चा ‘आव्वाज’ कमी करण्यास सांगितले जाऊ लागले. आवाजाच्या ‘डेसिबल’ ची पातळी वाढली की ‘डीजे’ बाबूंना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध खटले दाखल होऊ लागले. आता या खटल्यांची जबाबदारी ‘डीजे’च्या तालावर ना नाचणारे घेणार ना उत्सवाचे संयोजक. त्यामुळे असे खटले भरले की पोलिसांसमोर आपल्यालाच ‘नाचावे’ लागते हे ओळखून यावेळी ‘डीजे’ बाबूंनी ‘डीजे’ लावण्यासाठी असहकार पुकारला आहे.

त्यामुळे एकीकडे ‘दहीहंडी’चे ‘स्तर’ वाढविण्यास परवानगी मिळाली मात्र ‘डीजे’च्या भिंती वाढविण्यास पर्यायाने त्याच्या आवाजावर मर्यादा आल्यामुळे दहीहंडीचा वा अन्य उत्सव साजरे करण्यात तेवढी मजा राहिली नाही. ‘डीजे’ चा ‘आव्वाज’च नाही तर मग नाचणार तरी कोण? आणि ”अरे आवाज वाढीव, ‘डीजे’ तुझ्या आईची… ” असे ‘डीजे’ बाबुला सांगणार तरी कोण? ‘डीजे’ च्या आवाजाशिवाय उत्सवाची ‘झिंग’ चढणार तरी कोणाला? ‘डीजे’ चा ‘आवाज’ मिळमिळीत ठेवण्याविरुध्द ”आव्वाज’ उठविणारा कोणी तरी आहे काय? तसा कोणी तुम्हाला भेटलाच तर आम्हालाही सांगा!

सत्यश्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)