आवाज दणदणीत असताना दाबतोय कोण? – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला
मुंबई – तुमचा आवाज दणदणीत आहे ना? मग तो दाबतोय कोण? असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे आहोत. ज्यावेळी भूमिका घ्यायची वेळ येईल तेव्हा ती निश्‍चित घेईन. ती स्वार्थासाठी नसेल, तर मराठी माणूस आणि हिंदू यांच्या हिताचीच असेल, अशी ग्वाही देताना त्यांनी भाजपला इशाराही दिला.

परळ येथील डॉ. शिरोडकर शाळेत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि मुंबई वृत्तपत्र संघटना यांचे एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात ते बोलत होते. प्रजासत्ताकदिनी काढलेल्या भाजपाच्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना त्यांचा आवाज अचानक बसला. तेव्हा माझा आवाज बसला असला तरी भाजपाचा आवाज कोणी दाबू शकत नाही. कुणातही ती ताकद नाही, असे वक्‍तव्य केले होते. या वक्‍तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, वृत्तपत्रविक्रेत्यांचे ऋण माणणाऱ्यांपैकी मी आहे. 60 च्या दशकात ज्या एका व्यंगचित्रकाराने क्रांती केली. मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकातून ही व्यंगचित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं. मराठी माणसाच्या आवाजाला वाघाच्या डरकाळीचं बळ देण्याची, तमाम हिंदूंचा आवाज बुलंद करण्याची क्रांती शिवसेनाप्रमुखांनी केली. त्यात खांद्याला खांदा लावून तुम्ही सामील झालात. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुम्हाला न्याय मिळवून देईन, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुळात लोकशाहीचे चार स्तंभापैकी पत्रकारिता एक आहे. न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या स्तंभातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही दाद मागण्यासाठी या स्तंभाकडे येऊन आपल्या व्यथा मांडाव्या लागल्यात. इतकं या स्तंभाचं महत्त्व आहे. हा जर स्तंभ इतका महत्त्वाचा असेल, तर या स्तंभातील वृत्तपत्र विक्रेता हा एक महत्त्वाचा घटक आहे. तेच नसतील तर पत्रकारांचे विचार लोकांपर्यंत पोहोचणार कसे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भांडवलदार वृत्तपत्र आज दिवसेंदिवस जाडजूड होत आहेत. त्यांच्या सप्लिमेंट वाढत आहेत. सप्लिमेंट वाढताहेत त्यामधील जाहिरातींमुळे. या जाडजूड वृत्तपत्रांचे उत्पन्न वृत्तपत्र विक्रेत्यांनी पेलायचे. घरोघरीही विक्रेत्यांनीच पोहोचवायचे, पण जाहिरातींचे उत्पन्न मात्र भांडवलदारांनी घ्यायचे, असे हे चालणार नाहीत. तर त्या उत्पन्नातील हिस्सा वृत्तपत्र विक्रेत्यांपर्यंतही पोहोचायला हवा, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)