आवाज कोणाचा …!

मधुसूदन पतकी

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी करण्याचा केवळ भारतीय जनता पक्षच नाही तर शिवसेना ही प्रयत्न करत आहे. निवडणुकीपूर्वी युती झाली तर या दोन्ही पक्षांची संयुक्त रित्या तयार होणारी ताकद करिष्मा करू शकेल असा असा आशावाद पक्षाचे निष्ठावंत करत असतानाच जर युती झालीच नाही तर स्वःताची ताकद वाढवण्याची तयारी अंतीम टप्प्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष करत आहेत. कराड, कोरेगाव, पाटण तसेच माण खटाव-येथील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी या दोन्ही पक्षांनी जी रणनितीचे आयोजन केले आहे ते पक्ष संघटन आणि व्यक्तींना ताकद देण्यासाठी ही आहे.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय शिवतारे आहेत . केवळ पालकमंत्री पद बाळगण्याशिवाय त्यांनी जिल्ह्यासाठी विशेष काही केले नाही. त्यांच्या सातारा जिल्ह्यास भेट देण्याच्या वेळा ही ठरलेल्या होत्या. साताऱ्यात काही अप्रिय घटना घडली तर, स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवसा पासून स्वातंत्र्य दिनाच्या दुपार पर्यंत किंवा प्रजासत्ताक दिवसाच्या अदल्या दिवसा पासून दुपार पर्यंत ते सातारा जिल्ह्यात नक्की असतात हा नागरिकांचा सोडाच शिवसैनिकांचाही अनुभव आहे. कार्यकाळाच्या पहिल्हा, दुसऱ्या डीपीडीसी बैठकीत आपल्या फर्ड्या इंग्रजीत त्यांनी , मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांशी सतत संपर्गात असतो, असे सांगत आपले सातारा जिल्ह्यावर किती लक्ष आहे हे ठासवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर प्रशासकीय कामा शिवाय त्यांनी जिल्ह्याकडे किती लक्ष दिले हा संशोधनाचा विषय आहे. पक्ष बांधणी आणि आत्ता पर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी किती हिरिरीने भाग घेतला याची ही माहिती त्यांनी दिली पाहिजे. एक मात्र खरे मुंबईच्या महापालिकेत अपक्ष नगर सेवक शिवसेनेकडे वळवण्यात त्यांनी विशेष प्रयत्न केले, मात्र त्याच दरम्यान सातारा जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे त्यांनी जवळपास पाठ फिरवली होती. शिवसैनिक त्यांच्या एकूणच कार्यपध्दतीवर नाराज होते. संघटनात ताळतंत्र नव्हता, शिवसेनेचे मालक आणि कारभारी कोण याचा पत्ता नव्हता, खरा शिवसैनिक अस्वस्थ होता. याची माहिती अनेकदा परिष्ठांच्या कानावर घातली गेल्याचे ही शिवसैनिक सांगत होते मात्र परिस्थीती बदलली नाही. जिल्ह्यात शिवसेनेची एकमेव जागा राखली ती, आमदार शंभुराज देसाई यांनी . त्यांना मंत्रीपद देऊन त्यांच्या हातात जिल्ह्यातील संघटन बांधण्याची जबाबदारी दिली असती तर गेल्या चार वर्षात नक्कीच बदल दिसला असता. मात्र त्यांना प्रतिक्षा यादीवर ठेवल्याने त्यांनी पाटणचा गड राखण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायती पासून तयारी केली आणि आपल्याला जिल्ह्याच्या राजकारणापासून मर्यादित ठेवले. आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात संघटन मजबुत करणे आणि शिवसुैनकांमध्ये उर्जा निर्माण करण्याची जबाबदारी राज्यातील आघाडीचे वक्ते आणि थेट शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विश्‍वासातले प्रा. नितीन बानुगडे यांच्यावर आली आहे. पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटक म्हणून ते काम करत होते मात्र सातारा जिल्ह्यातील संघटन बांधणीत त्यांना पक्षांतर्गतच अडचणी होत्या. या अडचणी सोडवताना वेळ गेला असता त्यापेक्षा आहे ते सुरु ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने त्यांना दिल्यामूळे त्यांच्या मनातली शिवसेना त्यांना नक्कीच उभी करता येईल.
सातारा जिल्ह्याची त्यांना सखोल माहिती आहे. राज्यात त्यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तम वक्तृत्व हा त्यांचा गुण शिवसैनिकांना उर्जा देणारा असेल . सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा आमदार होणारे सदाशिव सपकाळ आणि पहिल्यांदा खासदार होणारे हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नंतर संधी असताना केवळ पुरेसे लक्ष न दिल्यामूळे इतर पक्षांना या ठिकाणी वाढण्यास संधी मिळाली. मेढा, खंडाळा, पाटण या भागात पंचायत समिती किंवा ग्रामपंचयातीत शिवसेनेने लक्षणिय काम केले होते. सध्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंत मानकुमरे यांनी लोकसभेची पहिली निवडणूक कराड लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या चिन्हावरच लढवली होती. आज हे शिवसेनेतील तिघेही शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात आहेत. तर सध्या वेगवेगळ्या पक्षात उड्यामारत शिवसेना डेरे दाखल झालेली मंडळी जुन्यांना बाजुला ठेवून स्वःता स्थिरावली आहेत. आता जुन्याचे सोडा पण नव्याने इतर पक्षातून भरती झालेल्यांना योग्य पध्दतीने हाताळणे आणि जुन्यांना पुन्हा एकदा कामाला लावणे आवश्‍यक आहे. आपापली स्वतंत्र संस्थाने मोडीत काढून शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येणे आवश्‍यक आहे. त्यांना भगव्या खाली आणायचे शिवधनुष्य प्रा. नितीन बानुगडे पाटील यांना उचलायचे आहे.
सातारा जिल्ह्याची लोकसभा तीन जागा आहेत. गेल्या निवडणुकीत साताऱ्याची जागा शिवसेनेने आरपीआयला दिली होती. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आरपीआय यांनी ताकद लावली होती असे गृहित धरले तरी आरपीआयचे उमेदवार अशोक गायकवाड यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आप सारख्या नुकत्याच स्थापन झालेल्या पक्षाचे उमेदवार राजेंद्र चोरगे यांनी त्यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली होती तर अपक्ष रिंगणात असलेल्या पूर्वाश्रमीच्या पुरुषोत्तम जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. शिवसेनेने पुरुषोत्तम जाधव यांच्या सारखा उमेदवारही आज मितीस गमावला आहे. आणि लोकसभा युतीच्या माध्यमातून लढवली गेली तर पुन्हा ही जागा जर आरपीआयला दिली गेली तर शिवसेनेने या मतदार संघात हिंदुराव नाईक निंबाळकर हे खासदार दिले होते हा कायमस्वरुपी इतिहास बनुन राहील. अर्थात उध्दव ठाकरे यांनी 48 च्या 48 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्याने सातारा लोकसभेसाठी उमेदवार शोधणे आवश्‍यक आहे. नितीन बानुगडे-पाटील यांच्या नावाची यासाठी चाचपणी सुरु आहे. तसेच आमदार शंभुराज देसाई यांना लोकसभेत पाठवावे असा ही एक प्रवाह शिवसैनिकांचा आहे. माहामंडळांच्या निवडीत सातारा जिल्ह्यास शिवसेनेने झूकते माप दिले आहे. कोरेगाव, रहिमतपूर , सातारा या भागाशी जवळचा संपर्ग असलेले प्रा.नितीन बानुनगडे-पाटील यांना ताकद देत शिवसेनेने आपले पहिले पाऊल निवडणुकीच्या दिशेने टाकले आहे. येत्या पंधरवड्यात राज्यातील सर्वच उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. सातारा लोकसभामतदार संघासाठी यापैकी किंवा दगडूदादा सपकाळ यांच्यासारखा मुळचा साताऱ्याचा आणि सध्या मुंबईत असलेल्या निष्ठावान शिवसैनिकाला निवडणूक लढवण्यास पक्ष प्रमुख पाठवू शकतात. मात्र राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले विरोधात रिंगणात असतील तर शिवसेनेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. शिवसेनेने 1996 सालात ही जागा हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या रुपाने जिंकली होती. त्यावेळची कारणे वेगळी होती. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना 1 लाख 13 हजारांवर मते घेतली होती आणि त्याचा फटका तत्कालीन खासदार प्रतापराव भोसले यांना बसला होता. मतविबाजनामूळे हिंदुराव नाईक निंबाळकर निवडून आले होते असे ही विश्‍लेषणातले एक कलम आहे. मात्र आज तशी परिस्थीती नाही. खासदार उदयनराजे भोसले यांची ताकद जिल्ह्यात आहे तसेच राष्ट्रवादीतून उभे राहील्यास पक्षाची ताकद मिळणार आहे. तेंव्हा शिवसेनेला आवाज कोणाचा हे आपल्या बाजूने ऐकायचे असेल तर कसून गृहपाठ करावा लागेल. कदाचित ही विधानसभेची पूर्व तयारी ही ठरेल .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)