आवली-रखुमाईच्या रुपात स्त्री वेदना मांडली

तळेगाव-दाभाडे – संत तुकारामांची पत्नी आवली आणि विठोबारायांची पत्नी रखुमाई या दोन्ही पात्रांतून स्त्री वेदना आणि संवेदनेचा एक वेगळाच दृष्टिकोन रंगमंचावर अवतरला तो देव-बाभळी नाटकाच्या रुपात. कलापिनी कला मंडळाने तळेगाव-दाभाडे येथे देव-बाभळी नाटकाचे सुंदर सादरीकरण केले.

आवलीची एक वेगळी प्रतिमा जनमानसात रुजली असली तरी तुकोबांना भंडाऱ्याच्या डोंगरावर भाकर-तुकडा घेऊन जाताना आवलीच्या पायात काटा रुततो आणि साक्षात विठुरायाच तो काटा काढतो. लेखक-दिग्दर्शक प्राजक्‍ता देशमुख यांनी काहीसा काल्पनिक विस्तार करून विठोबाची पत्नी रखुमाई हिलाही या प्रचलित कथेत सामावून घेतले. दोनही स्त्रियांची दु:खं सारखी आहेत आणि त्याकडे पाहायचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी यात मांडला आहे. एक देव स्त्री आणि दुसरी मर्त्य स्त्री मानव. परंतु त्यांची स्त्री म्हणूनची वेदना, जगण्याबद्दलची त्यांची खोल समज आणि त्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी यातून हे नाट्य घडत जाते. रखुमाईचं दु:खही आवलीपेक्षा वेगळं नाही. तिच्या व्यथा-वेदनेच्या उद्‌गारांतून ते सहज उमटते. नाटकाचे नेपथ्य-प्रदीप मुळ्ये, प्रकाश योजना-प्रफुल्ल दीक्षित नाटकाला पूरक होती व नाटकाची नाट्यात्मकता वाढवणारी होती. लेखन, दिग्दर्शन, अभिनय यातले बारकावे थक्क करणारे होते. त्यामुळेच एक परिपूर्ण कलाकृती बघितल्याचे समाधान तळेगावकरांना मिळाले.

भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते देव-बाभळी नाटकातील कलाकारांचा गौरव करण्यात आला. कलापिनी कला मंडळ 2018-19 योजनेचा शुभारंभ कलाकारांच्या हस्ते सभासदत्व वितरीत करून केला. कलाकारांनी तळेगावच्या जाणकार रसिकांचे आणि कलापिनीच्या उपक्रमांचे कौतुक केले व तळेगावला नाटक सादर कारण्यासाठी यायला आवडेल, असे त्यांनी सांगितले.

तळेगावकरांना अनेक उत्कट नाट्यानुभव कलापिनी कला मंडळामुळे नेहमीच मिळतात. त्यामुळेच तळेगावकर रसिक समृद्ध झाला आहे. आपणही या समृद्धीचा अनुभव घेऊ शकता. या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कलापिनी कला मंडळ प्रमुख संजय मालकर व चेतन शहा यांनी केले.

हे सर्व प्रभावीपणे आपल्या समर्थ अभिनयाने रसिकांसमोर मांडण्यात शुभांगी सदावर्ते (आवली) आणि मानसी जोशी (रखुमाई) यशस्वी झाल्या आहेत. विशेष म्हणजे विठोबा आणि तुकाराम बुवा यांचा आभास निर्माण करण्यात दोघीही आणि दिग्दर्शक यशस्वी झाले. आनंद ओक यांचे श्रवणीय संगीत आणि ध्वनी संयोजन नाटकाची परिणामकारकता वाढवते. रंगमंचावर प्रत्यक्ष गायली जाणारी गाणी ध्वनी मुद्रित आहेत की काय? असे भासणारे गायन आणि संगीत या नाटकाची जमेची बाजू ठरली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)