आवर्तनाचा निर्णय शेतकऱ्यांसमोर घ्या- प्रमोद लबडे 

कोपरगाव: गोदावरी कालव्यांचे आवर्तन ठरविताना कालवा सल्लागार समितीला कायद्याने अधिकार आहे. बैठकीत शेतकऱ्यांना शाश्‍वत निर्णयाची अपेक्षा असते. त्यामुळे गोदावरी कालव्यांच्या आवर्तनाचा निर्णय शेतकऱ्यांसमोरच व्हावा, अशी मागणी गोदावरी, शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक प्रमोद लबडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

लबडे यांनी पत्राकात म्हटले आहे की, मंत्र्यांच्या दालनात लोकप्रतिनिधींसमोर आवर्तनाबाबत निर्णय झाल्याची माहिती शेतकऱ्यांना वृत्तपत्रांतून समजते. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयापूर्वी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वास्तव परिस्थिती मांडली नाही. जायकवाडी धरणातील 24 तास सुरू असलेला अधिकृत व अनधिकृत पाणीउपशाबाबत नाशिक विभागाकडे कागदावर रेकॉर्ड नाही. जायकवाडीकरिता 9 टीएमसी पाणी सोडताना गोदावरी कालवे व नदीच्या लाभक्षेत्रातील शेतीचे हक्काचे आरक्षित पाण्याचे वाटोळे झाले, याबाबत लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांची नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत साशंकता आहे. कालवा सल्लागार समितीच्या कोपरगाव व राहता येथे बैठकी होऊन पाणी वाटप संस्थांचे अध्यक्ष व शेतकऱ्यांसमोर कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग यांनी आवर्तनाबाबत शाश्‍वत व अधिकृत माहिती द्यावी, अशी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

-Ads-

या बैठकीत धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, गोदावरी कालव्याची दुरुस्तीबाबतचे शासनाचे धोरण, चाऱ्यांची दुरुस्ती, पाणीवापर संस्थांच्या अडचणी याबाबत चर्चा होते. मात्र कालव्यांच्या नूतनीकरणाबरोबरच शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याबाबत कुठेही चर्चा होत नाही. वास्तविक रब्बीचे दोन आवर्तने व उन्हाळी एक आवर्तन ठरवितांना नाशिक पाटबंधारे विभागाने लाभक्षेत्रातील रब्बीच्या पेरण्या उभे असलेली ऊस व फळबागा पिके त्यांना लागणारे अंदाजित पाणी, याची प्रत्यक्षात आकडेवारी असणे आवश्‍यक आहे. माती ती त्यांच्याकडे नसते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न दुर्लक्षित होतात. गोदावरी कालव्याचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जमिनी देऊन शासनाकडून पाण्याची हमी म्हणून शेतकऱ्यांना दिलेले ब्लॉक समूह परवानगी राष्ट्रवादीच्या सरकारने रद्द केली. ते हक्काचे ब्लॉक या शासनाने शेतकऱ्यांना देऊन शाश्‍वत पाण्याची हमी द्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक व्हावी, अशी मागणीही केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)