आळेफाटा – येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश सोनवणे यांच्यावर बलात्काराचा महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने जामीन नाकारून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची पुणे येधील येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. मात्र, याबाबत संबंधित आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सुडबुद्धीने गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ आज आळेफाटा ग्रामस्थांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे निवेदन देऊन आग्रह धरला आहे. मात्र, याप्रकरणाची माहिती पोलीस देण्यास टाळाटाळ करीत असून या प्रकरणात दबाव असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
आळेफाटा पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जुन्नर तालुक्यात आरोग्य क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे वैद्यकीय आधिकारी डॉ. गणेश सोनावणे यांच्यावर सुडबुद्धी आणि कट कारस्थान करून काही लोकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी तालुक्यातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम चालु केली होती. त्यात वैद्यकीय अधिकारी गणेश सोनावणे याचा विशेष सहभाग होता. त्यातून बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली होती. याच गोष्टीचा आकस मनात ठेऊन काही लोकांनी डॉ. सोनवणे यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनी या घटनेचा जाहीर निषेध करून पोलिसांनी देखील शहानिशा करून गुन्हे दाखल करावेत. तरच तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सक्षम राहील अन्यथा विश्वास उडेल, असे सांगितले. यावेळी जुन्नर तालुका मेडिकल प्रक्टिशनर्स असोसिएशन, व्यापारी असोसिएशन आळेफाटा, रोटरी क्लब आळेफाटा मेन, आळे, संतवाडी, वडगाव आनंद, संतवाडी, डिंगोरे, आमले आदी परिसरातील राजकीय व सामाजिक मंडळी या निषेध सभेस उपस्थित होते. यावेळी सर्वांचे निवेदन आळेफाटा पोलिसांच्या वतीने ए.पी.आय मारूती खेडकर यांनी स्वीकारले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा