आळंदी सोसायटीसाठी बिनविरोधसाठी मोर्चेबांधणी

27 ऑगस्टला मतदान ः अर्ज माघारीची आज अंतिम मुदत
आळंदी- येथील आळंदी देवाची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित (आळंदी सोसायटी) च्या पंचवार्षिक सदस्य पदांचे निवडीसाठी उद्या सोमवारी (दि. 14) उमेदवारी अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत आहे. आवश्‍यकता असल्यास 27 ऑगस्टला मतदान व मतमोजणी होणार आहे.
सदस्य बिनविरोध निवडले जावेत यासाठी आळंदी व केळगावमध्ये मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सोसायटीचे हितासाठी बिनविरोध निवडी व्हाव्यात यासाठी स्थानिक गावपुढारी यांची कसरत सुरु आहे. या निवडणुकीत 13 जागांसाठी 31 अर्ज मुदतीत आले आहेत. एक राखीव जागा बिनविरोध झाल्याने 12 जागांसाठी दाखल अर्जातील दोन अर्ज छाननीत बाद झाले. 29 दाखल वैध अर्ज असून उमेदवारी माघारीसाठी सोमवार (दि. 14) अंतिम मुदत आहे. आवश्‍यकता असल्यास उर्वरित जागांसाठी मतदान व त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी 14 ऑगस्ट अंतिम मुदत आहे.
आळंदी सोसायटीसाठी 27 ऑगस्टला उमेदवारी अर्ज कायम राहिल्यास येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात मतदान व त्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणीसाठीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. मुलाणी यांनी सांगितले. आळंदी व केळगांव या दोन गावांसाठी आळंदी सोसायटी कार्यरत आहे. येथील शेतकरी या सोसायटीचे सभासद आहेत. सन 2017-18 ते सन 2021 – 22 या पंचवार्षिक कालावधीसाठी सदस्य निवडण्यात येणार आहेत. 16 ऑगस्टला पात्र उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात येणार आहे. आवश्‍यकतेनुसार 27 ऑगस्टला मतदान होईल. लगेच अर्ध्या तासाने आळंदीत मतमोजणी होऊन निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. मुलाणी यांनी सांगितले.
अंतिम मुदतीत उमेदवारी दाखल केलेला उमेदवारांमध्ये आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांची बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भटक्‍या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी साठी राखीव असलेल्या एका जागेसाठी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांचे बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
सर्वसाधारण खातेदार कर्जदार या साठी 8 जागा असून यासाठी 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, माजी नगरसेवक संभाजी कुऱ्हाडे, माजी सरपंच नंदकुमार मुंगसे, सोमनाथ मुंगसे, वासुदेव मुंगसे, उत्तम भोसले, ज्ञानोबा वहिले, शिवाजी मुंगसे, रोहिदास मुंगसे, दिलीप गुलाब कुऱ्हाडे, माजी चेअरमन ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्धन घुंडरे, शशिकांत घुंडरे, दिलीप तुकाराम कुऱ्हाडे, अनिल भांडवलकर, रघुनाथ वीरकर, सदाशिव कुऱ्हाडे, पांडुरंग वरखडे, बबनराव वहिले, प्रकाश घुंडरे, रामदास घुंडरे यांचा समावेश आहे. छाननीत माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे व बाबुलाल घुंडरे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.
अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी साठी राखीव असलेल्या एका जागेसाठी सुभाष सोनवणे व माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. महिला प्रतिनिधींच्या 2 जागा राखीव असून या साठी माजी नगरसेविका सुशीला कुऱ्हाडे, ताराबाई मुंगसे व भीमाबाई भांडवलकर यांचे अर्जाचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय संवर्गासाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी शशिकांत घुंडरे, सोमनाथ मुंगसे यांचे अर्ज दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)